IND vs NEP : भारताने महाशिवरात्रीच्या दिवशी क्रिकेटमध्ये डबल धमाका (IND vs NEP) केला. पुरुष आणि महिला दोन्ही स्तरावर भारतीय संघांनी पाकिस्तानला पराभूत करून चाहत्यांना मोठा आनंद दिला. प्रथम, सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्व कप २०२६ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आपला सलग तिसरा विजय नोंदवला आणि सुपर ८ फेरीत प्रवेश निश्चित केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १७५/७ धावा केल्या. ईशान किशन याने ४० चेंडूत ७७ धावांची तुफानी खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान १८ षटकांत ११४ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांनी कमाल केली; हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या विजयाने भारताने टी-२० विश्व कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ८-१ असा इतिहास रचला आणि ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवले. दुसरीकडे, महिला क्रिकेटमध्ये राधा यादव हिच्या नेतृत्वाखालील इंडिया ए संघाने एमर्जिंग आशिया कप २०२६ (ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026) मध्ये पाकिस्तानला पराभूत करून विजयाचे खाते उघडले. त्यानंतर मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी भारताने नेपाळ संघाला ७ विकेट्सने पराभूत करून सेमी फायनलमध्ये धडक मारली. या स्पर्धेत भारताने प्रथम यूएईकडून पराभवाचा सामना केला होता, पण त्यानंतर दोन सलग विजय मिळवले. नेपाळविरुद्धच्या सामन्यात राधा यादवने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी नेपाळला १८ षटकांत ७८ धावांवर गुंडाळले. तनुजा कंवर ने ४ विकेट्स, मिन्नू मणी ने ३ विकेट्स आणि कर्णधार राधा यादवने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने ७.५ षटकांत ८२ धावा करून ७९ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. वृंदा दिनेश ने नाबाद ३९ धावा केल्या (१८ चेंडूत ९ चौकार), तर तेजल हसबनीस ने १८ आणि अनुष्का शर्मा ने १० धावा केल्या. या स्पर्धेत ग्रुप ए मधून भारताने अव्वल स्थान मिळवले असून पाकिस्तान ए नेही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रुप बी मधून बांगलादेश ए सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे तर थायलंड ए आणि श्रीलंका ए या दोघांपैकी कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.