IND vs ENG : नितीश रेड्डीचा कहर; अवघ्या चार चेंडूंत केली इंग्लंडच्या सलामीवीरांची शिकार! VIDEO व्हायरल

IND vs ENG Nitish Kumar Reddy 2 Wickets In Just Four Balls : भारत आणि इंग्लंड संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या तासात त्यांच्या सलामीवीरांनी हा निर्णय योग्य ठरवला, परंतु त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात सामन्याचे चित्र पालटले. त्याने अवघ्या चार चेंडूत इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला.
नितीश रेड्डीने एकाच षटकात दिले दोन धक्के –
नितीश कुमार रेड्डीने इंग्लंडच्या पहिल्या डावातील १४वे षटक टाकले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने एक शॉर्ट बॉल टाकला. या चेंडूवर बेन डकेटने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या हॅन्ड ग्लोव्हजला लागून थेट मागे उभ्या असलेल्या यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातात गेला. अशा प्रकारे इंग्लंडला ४३ धावांवर पहिला धक्का बसला. बेन डकेटन ४० चेंडूत २३ धावा करून माघारी परतला. त्याच्या या खेळीत तीन चौकारांचा समावेश होता.
Nitish Kumar Reddy 🔥🤟 #ENGvsIND #NitishKumarReddy pic.twitter.com/jmrYHZM5wa
— Jagun Forever ®🔥💪 (@jagun_ys) July 10, 2025
यानंतर नितीश कुमार रेड्डी इथेच थांबला नाही. त्यानी अवघ्या दोन चेंडूंनंतर दुसरा सलामीवीर झॅक क्राउलीलाही बाद केले. ज्यामुळे इंग्लंडला एकाच षटकात दुसरा मोठा धक्का बसला. क्राउलीला त्यानी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला, ज्याने त्याच्या बॅटचा किनारा घेतला आणि तो ऋषभ पंतकडे गेला. यामुळे इंग्लंडला एकाच षटकात दोन मोठे धक्के बसले. तो ४३ चेंडूत १८ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा – IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीत सचिन तेंडुलकरचा खास सन्मान: घंटानादासह पोर्ट्रेटचे अनावरण!
नितीश रेड्डी साठी एजबॅस्टन कसोटी अतिशय खराब ठरली होती. त्यानी फलंदाजीत केवळ २ धावा जोडल्या; पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावातही १ धाव. गोलंदाजीबद्दल बोलायचे तर, एजबॅस्टनमधील पहिल्या डावात त्याला फक्त ६ षटकेच टाकण्याची संधी मिळाली आणि दुसऱ्या डावात तर त्याला गोलंदाजीच दिली गेली नाही. मात्र, भारतीय संघाने लॉर्ड्समध्ये रणनीती बदलली आणि नितीश रेड्डीला फक्त १३ षटके जुना चेंडू देऊन गोलंदाजी करण्याची संधी दिली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेत आपल्या स्विंग गोलंदाजीने इंग्लंडला दोन जोरदार धक्के दिले.





