IND vs ENG : ‘ब्रेकअपचे दुखः तर होतेच…’, ओव्हल कसोटीनंतर सिराजने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल केलं मोठं विधान
IND vs ENG Mohammed Siraj Reaction after Historic Win : मोहम्मद सिराजच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर भारताने ७७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परदेशी भूमीवर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्याचा मान मिळवला. ओव्हल कसोटीच्या अंतिम दिवशी इंग्लंडला विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज होती, आणि गस अॅटकिन्सन एका बाजूला खिंड लढवत होता. तेव्हा सिराजने आपल्या तुफानी यॉर्करने अॅटकिन्सनचा त्रिफळा उडवला आणि भारताने ६ धावांनी हा थरारक सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. यानंत
सिराजचे शानदार प्रदर्शन –
सिराजचे या सामन्यातील प्रदर्शन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ३०.१ षटकांत १०४ धावा देत ५ विकेट्स घेतले, तर संपूर्ण मालिकेत १८५.३ षटके टाकून २३ विकेट्स घेतले, जे इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त होते. पण आकडेवारी त्याच्या जिद्दी आणि समर्पणाची संपूर्ण कहाणी सांगू शकत नाही. ओव्हलच्या मैदानावर अंतिम दिवशी सिराजच्या विजयासाठीच्या तळमळीने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
सिराजचे भावनिक विधान व्हायरल –
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार शुबमन गिलसोबत उपस्थित असलेल्या सिराजने आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यामुळे त्याचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. शेवटची विकेट्स घेतल्यानंतरच्या भावनांबद्दल विचारले असता सिराज म्हणाला, “त्या क्षणी भावना खूप तीव्र होत्या. पण डीके (दिनेश कार्तिक) भाई आले आणि इंग्रजीत प्रश्न विचारू लागले, तेव्हा मी काय बोलायचे ते विसरलो. क्रिकेट माझे पहिले प्रेम आहे. मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो. जेव्हा मी सामना हरतो किंवा चांगली कामगिरी करू शकत नाही, तेव्हा मला खूप दुखः होते. मी क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली आहे. क्रिकेटवर माझे प्रेम आहे आणि ब्रेकअपचे दुखः तर होतेच.”
सिराज ठरला सामन्याचा हिरो –
ओव्हल कसोटीत मोहम्मद सिराज भारतीय संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. त्याने इंग्लंडच्या दोन्ही डावांमध्ये फलंदाजीला खिंडार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले. सिराजच्या या ऐतिहासिक योगदानामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





