IND vs ENG 1st Test Day 3 : ओली पोपचे शानदार शतक, दुसऱ्या डावात इंग्लंडची आघाडी 50 धावांच्या पार…

India Vs England 1st Test in Hyderabad Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून 421 धावांवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि आणखी 15 धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. सध्या इंग्लंडचा दुसरा डाव सुरू आहे.
ताज्या वृत्तानुसार इंग्लंडच्या ऑली पोपने 154 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. त्याच्या शतकामुळे इंग्लंडची धावसंख्या पाच विकेट्सवर 248 धावांवर पोहोचली आहे. पोप 102*(159) आणि बेन फॉक्स 31*(70) धावांसह क्रीजवर आहेत. दोघांमध्ये 82+ धावांची भागीदारी झाली आहे. इतकेच नाही तर इंग्लंडची आघाडीही 58 धावांपर्यंत वाढली आहे.
A remarkable hundred from Ollie Pope 🤩#WTC 25 | #INDvENG pic.twitter.com/KpXsweZNu7
— ICC (@ICC) January 27, 2024
दरम्यान, याआधी सकाळी पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 436 धावांवर संपला. इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या होत्या. या दृष्टीने टीम इंडियाकडे सध्या 190 धावांची आघाडी आहे. भारताकडून रवींद्र जडेजाचे शतक हुकले. तो 87 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर केएल राहुलने 86 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. जो रूटने चार विकेट घेतल्या. जो रूटचा कसोटीतील हा दुसरा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध आठ धावांत पाच बळी घेतले होते.
तिसऱ्या दिवशी म्हणजे आज भारताने सात विकेट्सवर 421 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 15 धावा जोडण्यासाठी उर्वरित तीन विकेट गमावल्या. भारताला आजचा पहिला धक्का जो रूटने दिला. त्याने डावाच्या 120 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. सर्वप्रथम रूटने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 180 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून बाद झाला.
त्याचवेळी पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह क्लीन बोल्ड झाला. बुमराहला खातेही उघडता आले नाही. रेहान अहमदने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव 436 धावांवर संपुष्टात आणला. अक्षरने 100 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावांची खेळी केली.
ISSF World Cup 2024 Cairo shooting : भारताच्या अनुराधा देवीला रौप्यपदक…
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी)ही रूटने पहिली विकेट घेतली होती. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या यशस्वी जैस्वालला त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. यशस्वीला 74 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 80 धावा करता आल्या. त्याचवेळी राहुलचेही शतक हुकले. त्याने 123 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. केएस भरत 41 धावा, अश्विन एक धावा, श्रेयस अय्यर 35 धावा, शुभमन गिल 23 धावा आणि कर्णधार रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून रुटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, तर टॉम हार्टले आणि रेहानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जॅक लीचने एक विकेट घेतली.



