IND vs ENG 1st Test : टीम इंडियाची आजपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी…

हैदराबाद – कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मायदेशात आजपासून येथे सुरु होत असलेल्या पहिल्या सामन्याद्वारे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज बनला आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार असला तरीही गेल्या मोसमापासूनची इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहता यजमान भारकीचय संघासाठी ही मालिका वाटते तेवढी सोपी नसेल.
INDvENG : पहिला कसोटी सामना
वेळ – सकाळी ९.३० पासून
ठीकाण – हैदराबाद
थेट प्रक्षेपण – स्पोर्टस १८
हा सामना येथील स्व. राजीव गांधी स्टेडियमवर होत असून आतापर्यंतचा येथील खेळपट्टीचा इतिहास पाहता सुरुवातीची काही षटके वगळता वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. तसेच संध्याकाळच्या सत्रात काही प्रमाणात दव पडत असल्यामुळे थोडा स्विंग मिळतो मात्र, सध्या इंग्लंडची गोलंदाजी पाहता जेम्स अंडरसन व मार्क वूड हे जास्त धोकादायक ठरु शकतात. कारण त्यांच्यकडे रिव्हर्स स्विंगची कला आहे.
भारतीय संघ नेमका याचबाबतीच कमी पडेल अशी भीती आहे कारण संघात महंमद शमी नाही. महंमद सिराज उपयुक्त ठरत असला तरीही जसप्रीत बुमराह हाच भारताच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ राहील यात शंका नाही. बाकी फिरकीची मदार रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांच्यावरच राहणार हे देखील स्पष्ट आहे. भारतीय संघाला जास्त सावध राहावे लागणार आहे हे फलंदाजीच्या बाबतीत. कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल वगळता बाकी फलंदाज त्या मनाने नवखे आहेत. त्यातच अनेक वर्षांनी इंग्लंडचा संघ भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येत असल्याने त्यांच्या गोलंदाजीचा फारसा अभ्यासही आपल्याला नाही. अशा स्थितीत शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल व श्रेयस अय्यर यांच्यासह संघातील नवोदित कशी फलंदाजी करतात हे खूप महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे इंग्लंडच्या संघात कर्णधार बेन स्टोक्स, मार्क वूड, जॉनी बोअरस्टो, ज्यो रुटसारखे दीग्गज फलंदाज आहेत. त्यातही खुद्द कर्णधार स्टोक्स व वूड हे अष्टपैलु आहेत. त्यांचा संघ पाहीला तर त्यांच्या फलंदाजीत खोली आहे. त्यांना रोखण्यासाठी रोहित शर्मासह सर्वच खेळाडूंना योजना तयार करुन त्यानूसारच खेळ करावा लागणार आहे.
हॅरी ब्रुकच्या जागी घेतलेला डॅनी लॉरेन्स याच्यासह जॅक क्राऊली, बेन डकेट व ओली पोप हे गेल्या मोसमापासून सातत्याने धावा करत आहेत. त्यामुळे बुमराह आणि कंपनीला त्यांना रोखण्यासाठी कमालीचे सावध राहावे लागणार आहे. त्यातच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत गचाळ क्षेत्ररक्षण केले होते, त्यामुळे या एका क्षेत्रात त्यांना खूप मोठी सुधारणा करावी लागणार आहे.
कोहलीची उणिव भासणार…
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली वैयक्तीक कारणाने या मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत खेळणार नसल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्याच्या जागी कोणाला अंतिम संघात संधी मिळते हे देखील पाहणे गरजेचे आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपासून कोहली भरात आहे. मात्र, त्याने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने न खेळण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय संघाला त्याची उणिव निश्चितच जाणावेल.





