IND vs BAN : विश्रांतीनंतर तिसऱ्या सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी घेतला भाग, रोहित-विराटनं केला कसून सराव….

Team India Attend Third training season in Chepauk :- बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सोमवारी येथील चेपॉक मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील 16 खेळाडूंनी कसून सराव करताना घाम गाळला. रविवारी भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळाली होती, परंतु सोमवारी तिसऱ्या सराव सत्रात सर्व 16 खेळाडूंनी भाग घेतला. यावेळी सर्व खेळाडूंनी घाम गाळला, मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी जोरदार फलंदाजीचा सराव केला.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून येथे खेळवला जाणार आहे. सराव सत्रात अनुभवी विराट कोहली प्रथम फलंदाजीसाठी आला होता आणि युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल त्याच्या शेजारी नेटमध्ये सराव करताना दिसला. या दोन्ही फलंदाजांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनविरुद्ध फलंदाजीचा सराव केला.
Tuning up for the Chennai Test 🇮🇳#INDvBAN pic.twitter.com/nTx9bY28zm
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 16, 2024
या दोघांनंतर कर्णधार रोहित, शुभमन गिल आणि सरफराज खान फलंदाजीच्या सरावासाठी पोहोचले. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यानंतर सरफराज उशिरा संघात दाखल झाला. रोहितने सराव सत्रात फिरकी गोलंदाजांविरुद्ध अधिक फलंदाजी केली. अष्टपैलू रवींद्र जडेजा, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनीही स्थानिक गोलंदाज आणि थ्रोडाउन तज्ज्ञांविरुद्ध सराव केला.
अक्षर पटेलला संधी कमी….
पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत स्वीप केल्यानंतर बांगलादेशचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. चेन्नईची खेळपट्टी साधारणपणे फिरकीपटूंसाठी उपयुक्त असते आणि अशा स्थितीत भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल, तर फिरकी विभागात अश्विन आणि जडेजासह कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काही काळ आपल्या अष्टपैलू खेळाने सतत छाप पाडणाऱ्या अक्षर पटेलला बाहेर बसावे लागू शकते.
पंत दोन वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करण्यास तयार आहे. पंत अंतिम अकरामध्ये आल्याने इंग्लंडविरुद्धच्या गेल्या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला बेंचवर बसावे लागणार आहे.





