India vs Bangladesh 1st Test, Day 1 Stumps : चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी भारताने खराब सुरूवातीनंतर बांगलादेशविरुद्ध दमदार पुनरागमन केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी केली. शतक झळकावल्यानंतर अश्विन नाबाद राहिला. रवींद्र जडेजाही शतकाच्या जवळ आहे. 86 धावा करून तो देखील नाबाद माघारी परतला आहे. या दोघांमध्ये नाबाद 195 धावांची भागीदारी झाली आहे. बांगलादेशकडून हसन महमूदने 4 बळी घेतले.
टीम इंडिया नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली . यादरम्यान 96 धावसंख्येवर भारतानं 4 गडी गमावले होते. त्याचवेळी 144 धावसंख्येपर्यंत पोहचताना भारताने आणखी दोन गडी गमावले. म्हणजेच भारताची स्थिती 6 बाद 144 अशी असताना यानंतर जडेजा आणि अश्विनने जबाबदारी स्वीकारत सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. जिथे भारताचे स्टार फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत होते, तिथे जडेजा आणि अश्विनने उत्कृष्ट खेळी खेळून भारताला संकटातून सोडवले आणि संघाला आरामदायी स्थितीत आणले. या दोघांमध्ये 195 धावांची भागीदारी झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अश्विन आणि जडेजा नाबाद राहिले. तर यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले.
अश्विनने झळकावले कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक….
अश्विन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने 112 चेंडूंचा सामना करत नाबाद 102 धावांपर्यत मजल मारली. अश्विनच्या या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अश्विनने जडेजासोबत दमदार भागीदारी केली. जडेजाने 117 चेंडूंचा सामना करत नाबाद 86 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. या दोघांशिवाय यशस्वी जैस्वालनेही चांगली कामगिरी केली. त्याने 118 चेंडूत 56 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 9 चौकार मारले.
That’s Stumps on the opening Day of the Chennai Test! #TeamIndia slammed 163 runs in the final session, courtesy ton-up R Ashwin and Ravindra Jadeja 🔥 🔥
We will be back for Day 2 action tomorrow! ⌛️#INDvBAN | @IDFCFIRSTBank
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2 pic.twitter.com/LdgKN746Xe
— BCCI (@BCCI) September 19, 2024
स्टार फलंदाज ठरले फ्लॉप…
यशस्वी जैस्वाल वगळता भारताची शीर्ष फळी पूर्णपणे अपयशी ठरली. टीम इंडियाने 14 धावांवर पहिली विकेट गमावली होती. रोहित 19 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. शुभमन गिलला तर खातेही उघडता आले नाही. त्याने 8 चेंडूंचा सामना केला. स्टार फलंदाज विराट कोहली 6 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर ऋषभ पंतने काही धावा जोडल्या. त्याने 52 चेंडूत 39 धावा केल्या. पंतच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर केएल राहुलही अपयशी ठरला. तो 16 धावा करून बाद झाला.
हसनने दिले जोरदार धक्के…
हसन महमूदने टीम इंडियाच्या महत्वाच्या चार विकेट (रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली,ऋषभ पंत) घेतल्या. त्याने पहिल्या 18 षटकात 58 धावा देत 4 बळी घेतले. या काळात 4 मेडन षटकेही टाकली. नाहिद राणाने 17 षटकात 80 धावा देत 1 बळी घेतला. मेहदी हसनने 21 षटकात 77 धावा देत 1 बळी घेतला.