Ind vs Ban 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून एमए, चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या गोलंदाजांनी जवळपास योग्यच ठरवला. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत 144 धावा होईपर्यंत भारतीय संघाने 6 विकेट गमावल्या होत्या, त्यात यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीतून केवळ 56 धावांची खेळी पाहायला मिळाली. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने संघाला या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले आणि 7व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारीही केली.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आले तेव्हा बांगलादेशच्या गोलंदाजांचे दडपण भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होते. यानंतर अश्विनने आक्रमक पवित्रा घेत बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. त्याला जडेजानेही चांगली साथ दिली आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे गेली. दोघांनी मिळून 7व्या विकेटसाठी 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध 7व्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता, ज्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती, जी आता अश्विन आणि जडेजा जोडीने मागे टाकली आहे.
वास्तविक, आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी डावाला आकार देताना बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताला 6 बाद 339 धावांपर्यंत मजल मारून दिली. यादरम्यान दोघेही नाबाद माघारी परतले.
अश्विन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने 112 चेंडूंचा सामना करत नाबाद 102 धावांपर्यत मजल मारली. अश्विनच्या या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अश्विनने जडेजासोबत दमदार भागीदारी केली. जडेजानेही 117 चेंडूंचा सामना करत नाबाद 86 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. दोघेही अजूनही खेळपट्टीवर नाबाद असून त्यांनी 7व्या विकेटसाठी या दोघांमध्ये 195 धावांची भागीदारी झाली आहे. ही जोडी आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यामध्ये भर टाकून आणखी काही विक्रम आपल्या नावावर करते का…? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.