IND vs BAN 1st T20 : हार्दिक पांड्यानं मोडला कोहलीचा मोठा विक्रम, ‘या’बाबतीत मिळवलं अव्वल स्थान….

Hardik Pandya broke Virat Kohli record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्याने भारतासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिक पांड्याने या सामन्यात 16 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तसेच 4 षटकं टाकत 26 धावा दिल्या आणि 1 बळी देखील घेतला.
या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नावावर एका मोठ्या कामगिरीची नोंद झाली आहे. त्याने विराट कोहलीला एका बाबतीत मागे टाकले आहे. वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. यासह हार्दिक हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारून सर्वाधिक वेळा सामना जिंकवणारा खेळाडू ठरला आहे. हार्दिक पांड्यानं पाचव्यांदा षटकार मारून भारताला जिंकवलं आहे.
हार्दिक पांड्याने तस्किन अहमदच्या चेंडूवर षटकार मारला आणि विराट कोहलीला मागे टाकत पहिल्या स्थानावर विराजमान झाला. विराट कोहलीने चारवेळा षटकार मारून भारताला जिंकवलं आहे. आता या शर्यतीत हार्दिक पांड्यानं बाजी मारली आहे.
IND vs BAN 1st T20 : हार्दिक-सूर्याची दमदार खेळी, टीम इंडियाचा बांगलादेशवर शानदार विजय…
अर्शदीपला टाकले मागे….
गोलंदाजीतही त्याने अर्शदीप सिंगला मागे सोडले. आता तो टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. आता त्याच्या नावावर 87 विकेट आहेत, तर अर्शदीपच्या नावावर 86 विकेट आहेत. युजवेंद्र चहल 96 विकेट्ससह आघाडीचा भारतीय गोलंदाज आहे.





