Rohit Sharma : रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी का? सुनील गावस्कर म्हणाले…

Rohit Sharma Test Retirement: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सीरिजमधील चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा 184 धावांनी पराभव करत सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. या संपूर्ण सीरिजमध्ये भारतीय संघातील प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मावर त्याच्या सीरिजमधील कामगिरीवरून निशाणा साधला जात आहे. रोहितने आता कसोटीतून निवृत्ती घ्यावी, असे अनेकजण म्हणत आहेत. त्यातच आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहितच्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
रोहितने या सीरिजनंतर निवृत्ती स्विकारावी, असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, रोहित शर्माचा फॉर्म पाहता व तो ज्याप्रमाणे विकेट गमावत आहेत, त्यामुळे त्याने पुढील सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी.
तसेच, रोहितच्या निवृत्तीनंतर मॅनेजमेंटने देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2027 साठी संघ तयार करायला हवा, अशी भूमिका गावस्कर यांनी मांडली. रोहितचा हा शेवटचा सामना असेल का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, धावा न केल्यास त्याचा हा शेवटचा सामना असू शकतो. या पराभवासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची भारताची शक्यता कमी झाली आहे.
रोहित ठरला सर्वात खराब कामगिरी करणारा कर्णधार
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा परदेशी कर्णधार ठरला आहे. रोहितने या सीरिजमधील 5 डावांमध्ये 6.20 च्या सरासरीने केवळ 31 धावा केल्या आहेत. या 5 डावात त्याने 3, 6, 10, 3 आणि 9 धावा केल्या.





