IND VS AUS : 14 वर्षांचा विजयाचा वनवास संपणार? कांगारूंना नमविण्याचे भारतासमोर आव्हान

दुबई : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघासमोर उपांत्य फेरीत कांगारूंचे आव्हान असणार आहे. आयसीसी च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या स्पर्धामध्ये कांगारुंची कामगिरी जरी भारतीय संघापेक्षा उजवी असली तरी देखील यावेळी फिरकी गोलंदाजांची सुरु असलेली उत्कृष्ट कामगिरी सामन्याला कलाटणी देण्यासाठी पुरेशी आहे.
यापूर्वी कांगारूंनी २०२३ मध्ये घराच्या मैदानावर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला नमविले होते. त्यामुळे या स्पर्धेत कांगारूंना नमवून पराभवाची परतफेड करण्याची भारताकडे चांगली संधी असणार आहे. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क हे प्रमुख गोलंदाज या स्पर्धेत खेळले नाहीत. तरी देखील ऑस्ट्रेलियन संघ अजूनही मजबूत मजबूत आहे. लाहोरमध्ये झालेल्या लढतीत इंग्लंडने दिलेले ३५२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने गाठून आपण देखील विजेतेपदाचे दावेदार असल्याचे ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला होता की, “ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा एक चांगला सामना असेल. ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमध्ये चांगला खेळण्याचा इतिहास आहे आणि आता आपल्याला सर्वकाही व्यवस्थित करावे लागेल. आशा आहे की आपण ते करू शकू, असे रोहित म्हणाला.
१४ वर्षांचा विजयाचा वनवास
आयसीसीच्या स्पर्धेत भारताने २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या बाद फेरीत कांगारूंना नमविले होते. त्यानंतर भारताला ही किमया करता आली नाही. कांगारूंनी भारताला २०१५ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत व २०२३ च्या अंतिम फेरीत नमविले होते. याशिवाय त्यांनी २०२३ च्या विश्व कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे गेल्या १४ वर्षांपासून भारताला आयसीसीच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध यश मिळाले नाही. त्यामुळे १४ वर्षांचा वनवास संपविण्याचे भारतासमोर आव्हान असणार आहे.
फिरकीचा मास्टरस्ट्रोक
भारतीय संघाने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने बांगलादेश, पाकिस्तान व न्यूझीलंडला पराभूत करताना गटातील अव्वल स्थानासह स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे भरपूर आत्मविश्वास आहे. याचे मुख्य कारण म्हणजे संघात असलेले अव्वल दर्जाचे फिरकीपटू. स्पर्धेपूर्वी संघात पाच फिरकीपटूंचा समावेश करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. परंतु आता दुबईच्या संथ खेळपट्ट्यांवर हा एक मास्टरस्ट्रोक ठरत आहे. दुबईमध्ये सर्व सामने खेळण्याचा फायदा भारताला मिळत असल्याचेही म्हटले जात आहे, परंतु भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात आपली कामगिरी सातत्याने सुधारली आहे.
तरीही तुम्हाला सर्वोत्तम द्यावेच लागणार – वरूण
येथील खेळपट्ट्या खूप वळण घेत आहेत, असे देखील काही नाही. उलट भारतीय फिरकी गोलंदाजांनी संयमाने गोलंदाजी केल्याने ते प्रभावी ठरले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाच बळी टिपणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती म्हणाला, जसे म्हटले जाते तसे येथील खेळपट्टी रँक टर्नर नाही. यामुळे नक्कीच थोडी मदत झाली आहे, हे मान्य करावेच लागणार आहे. परंतु अशा खेळपट्टयांवर देखील तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागेल. चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकी गोलंदाजांनी किवींचे नऊ फलंदाज तंबूत पाठवले. त्यांनी ३९ षटकांत १२८ डॉट बॉल टाकले. केन विल्यमसनसारख्या धीरगंभीर फलंदाजानेही अक्षर पटेलविरुद्ध आपला संयम गमावला आणि केएल राहुलने त्याला यष्टीचीत केले.
ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी
ऑस्ट्रेलियाकडे ॲडम झांपा म्हणून फक्त एकच स्पेशालिस्ट स्पिनर आहे. त्यामुळे कांगारूंना अनियमित फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मॅथ्यू शॉर्टला पायाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसरा फिरकी गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध नाही. इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अनुक्रमे ३५२ आणि २७३ धावा चोपण्यात आल्या होत्या.
संघ पुढीलप्रमाणे :
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि अॅडम झांपा.





