IND vs AUS : विराट-रोहितने ऑस्ट्रेलियाचे स्वप्न मिळवले धुळीस! सिडनीमध्ये ९ वर्षांनी केला ‘हा’ खास पराक्रम

IND vs AUS India wins ODI in Sydney after 9 years : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना सिडनीत पार पडला. या सामन्यात भारताने 9 गडी राखून शानदार विजय मिळवत मालिकेत क्लीन स्वीप टाळला. विशेष म्हणजे भारताने या मैदानावर 9 वर्षांनी वनडे सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचे क्लीन स्वीपचे स्वप्न धुळीस मिळवले. या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह हर्षित राणाने महत्त्वाची भूमिका बजावली.
रोहित-विराटची दमदार खेळी –
भारतीय संघाने या सामन्यात दोन्ही विभागात अप्रतिम कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय गोलंदाजांनी 46.4 षटकांत 236 धावांत गारद केले. प्रत्युत्तरात 237 धावांचे लक्ष्य केवळ एक गडी गमावत 38.3 षटकांत सहज पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने 121 धावांची नाबाद शतकीय खेळी केली, तर मागील दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने 74 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी साकारली.
ऑस्ट्रेलियाचे क्लीन स्वीपचे स्वप्न धुळीस –
— BCCI (@BCCI) October 25, 2025
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताविरुद्ध प्रथमच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी होती. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले. सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी 69 धावांची शानदार भागीदारी केली. गिल 24 धावा करून जोश हेझलवुडच्या षटकात बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर खाते उघडत दिलासा मिळवला आणि रोहितसोबत 168 धावांची अखंडित भागीदारी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्सची एकही संधी दिली नाही.
हेही वाचा – IND vs AUS : रोहितचा शतकी धमाका, कोहलीचा अर्धशतकी झंजावात; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय!
सिडनीत 9 वर्षांनंतर एकदिवसीय विजय –
सिडनी क्रिकेट मैदानावर भारताचा एकदिवसीय सामन्यांतील इतिहास फारसा चांगला नाही. मात्र, 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने या मैदानावर एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. यापूर्वी 2016 मध्ये भारताने सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवला होता, ज्यात रोहित शर्माने 99 धावांची शानदार खेळी केली होती. आता या एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघ 29 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आमनेसामने येतील.





