IND vs AUS 4th Test : शतक हुकलं तरीही यशस्वीनं केली कमाल, मोडित काढला सचिन तेंडुलकरचा ‘मोठा’ विक्रम…

Yashasvi Jaiswal broke Sachin Tendulkar’s record | ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहेत. यादरम्यान टीम इंडियाच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने दमदार खेळी केली. त्याने 118 चेंडूंचा सामना करत 82 धावा केल्या. यशस्वी शतक झळकावण्यात अपयशी ठरला असला तरी पण त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. यशस्वीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा एक महान विक्रम मोडित काढला आहे.
A superb Yashasvi Jaiswal innings ends in a heartbreaking run out 💔
🔗 https://t.co/ycgxNhumqw | #AUSvIND pic.twitter.com/tsOzZOCrf2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 27, 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात 5 गडी गमावून 164 धावा केल्या असून भारत अजूनही 310 धावांनी मागे आहे. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 3 धावा करून बाद झाला. पण यशस्वी प्रदीर्घ खेळीनंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. या कालावधीत 82 धावा केल्या. यशस्वी धावबाद झाला. विराट कोहलीने 36 धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यशस्वीने तोडला सचिन-विश्वनाथचा विक्रम…
युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने कमाल केली आहे. त्याने भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरसह गुंडप्पा विश्वनाथ यांना पिछाडीवर टाकले आहे. विश्वनाथने 1979 मध्ये 1 हजार 388 धावा केल्या होत्या तर सचिनने 2002 मध्ये 1 हजार 392 धावा केल्या होत्या.
सेहवागचा विक्रम मोडणार का…?
यशस्वीने 2024 मध्ये 1 हजार 394 धावा केल्या आहेत. आता त्याने सचिनला मागे टाकले आहे, पण या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. सेहवागने 2010 मध्ये 1 हजार 562 धावा केल्या होत्या. यशस्वीकडे सेहवागचा विक्रम मोडण्याची अजूनही संधी आहे. त्यासाठी त्याला चालू कसोटीत दुसऱ्या डावात 169 धावांची खेळी करावी लागेल.
यशस्वीची आत्तापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द …
यशस्वीची कसोटी कारकीर्द आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 18 सामन्यांच्या 33 डावात 1 हजार 682 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 2 व्दिशतके केली आहेत. यशस्वीने 9 अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वीची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 214 धावा आहे. यशस्वीने टीम इंडियासाठी 23 टी-20 सामनेही खेळले आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने एकूण 723 धावा केल्या आहेत.





