क्रिकेट कॉर्नर : जेव्हा जैस्वालच ‘अ’यशस्वी ठरतो…

क्रिकेटच्या मैदानावर चपळता खूप महत्त्वाची असते, परंतु काहीवेळा कठोर परिश्रमां व्यतिरिक्त, नशिबाची साथ पण लागते. खेळाडू क्षेत्ररक्षण करताना साधे झेल सोडतात, याचा फायदा विरोधी संघाचे खेळाडू घेतात, असे अनेकदा सामन्यांमध्ये दिसून येते. असेच काहीसे मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पाहायला मिळाले, जिथे भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल क्षेत्ररक्षण करताना सपशेल अपयशी ठरला.
चौथ्या दिवशी खेळाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत यशस्वी जैस्वालने एकूण 3 झेल सोडले. यशस्वीने प्रथम उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. यानंतर त्याने मार्नस लॅबुशेन आणि पॅट कमिन्सचाही सोपा झेल घेतला नाही. यानंतर कर्णधार रोहित शर्माचा मैदानातच संयम सुटला आणि तो खूप संतप्त दिसत होता, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडिया पहिल्या डावात 369 धावा करून ऑलआऊट झाली; यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिनाला पहिला झटका लवकर बसला असता, पण जैस्वालच्या पहिल्या चुकीमुळे ख्वाजाला 2 धावांवर जीवदान मिळाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फक्त 7 धावा होती. येथून ख्वाजाने एकूण 21 धावांची खेळी खेळली.
ख्वाजाचा झेल सोडल्यानंतर जैस्वाल ‘यशस्वी’ क्षेत्ररक्षण करेल अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा असताना त्याने मात्र उपेक्षाच केली.
त्यानंतर त्याने त्याने मार्नस लॅबुशेनचा झेल सोडला. अशा वेळी 6 बाद 99 अशी स्थिती असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करण्याची पूर्ण संधी मिळाली. लॅबुशेनचा झेल सोडला तेव्हा तो 46 च्या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करत होता, त्यानंतर जैस्वाल याच्या ‘अयशस्वीते’मुळे तो 70 धावांची इनिंग खेळण्यात ‘यशस्वी’ झाला.
याशिवाय सिली पॉईंटवर क्षेत्ररक्षण करताना जैस्वालने सामन्यातील तिसरी चुक केली. 21 धावांवर खेळत असणाऱ्या पॅट कमिन्सचाही त्याने झेल सोडला. चेंडू येण्यापूर्वीच तो उठला आणि बॉल त्याच्या पायांमधून गेला.
रोहित-विराटचा संताप…
यशस्वीच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर क्षेत्ररक्षणावर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रचंड संताप व्यक्त करताना दिसले. जैस्वालने महत्त्वाच्या वेळी लॅबुशेनचा झेल सोडला, तेव्हा कोहलीही त्याच्यासोबत स्लिपमध्ये होता, तो रागात दिसत होता. जैस्वालने कमिन्सचा सिली पॉईंटवर झेल सोडला तेव्हा कर्णधार रोहित बराच वेळ त्याच्याकडे बघत राहिला. तसेच, आकाश दीपसह अन्य गोलंदाजांनी त्याच्यावर यथेच्छ राग व्यक्त केला.





