IND vs AUS 4th Test : जोखीमपूर्ण धाव घेण्याची आवश्यकता नव्हती – सुनील गावस्कर

IND vs AUS 4th Test :- ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या डावात विशाल धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल परतले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व विराट कोहली यांनी शतकी भागीदारी करताना भारताच्या डावाला सुस्थितीत आणले. मात्र, चोरटी धाव घेण्याचा यशस्वीचा प्रयत्न फसला आणि त्याला धावबाद व्हावे लागले. त्यानंतरच्या पुढच्याच षटकात कोहली देखील बाद झाला. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची चोरटी धाव घेण्याची जोखीम दोघांनी घेण्याची आवश्यकता नव्हती, असे माजी क्रिकेटपटू व सामालोचक सुनील गावस्कर म्हणाले.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर यशस्वी 82 धावांवर खेळत असताना, त्याने लॉगऑनला कमिन्सकडे चेंडू मारला आणि धाव काढण्यासाठी निघाला. मात्र दुसऱ्या बाजूला असलेला कोहली चेंडूकडे आणि कमिन्सकडे पाहात होता. कोहलीने जागेवर धावेसाठी नाकार दिला, मात्र, तोपर्यंत यशस्वी दुसऱ्या बाजूला आला होता. कमिन्सने स्टम्प्सजवळ पोहोचलेल्या ऍलेक्स कॅरीकडे चेंडू सोपविला व कॅरीने बेल्स उडविल्या. त्यामुळे चांगल्या धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालला बाद व्हावे लागले. त्यानंतर विराट कोहली देखील झटपट बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाला दोन्ही महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यात यश मिळाले.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले की, ही धाव जलद झाली असती, तर विराट कोहली सारख्या खेळाडूने नक्कीच ती पूर्ण केली असती. मात्र फटका मारल्यानंतर तो क्षेत्ररक्षकाकडे पाहात होता. जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षकाकडे पहाता आणि वळता त्यावेळी तो महत्वाचा वेळ तुम्ही गमावता. अशा वेळी तुमचा तोल पूर्णपने बिघडतो आणि धाव पूर्ण करणे कठीण होते. ती परिस्थिती जोखमीची धाव घेण्याची नव्हती. खरंच अशी धाव घेण्याची आवश्यकता होती का ? तुम्ही चांगली फलंदाजी करता आहात, तर असा धोका पत्करणे अपेक्षित नसल्याचे गावस्कर बोलताना म्हणाले.
IND vs AUS 4th Test : कोहलीचा ज्याच्यासोबत झाला होता वाद; त्याच्या नावावर नोंदवला गेला विश्वविक्रम…
ही अतिशय जोखमीची धाव होती…
पॅट कमिन्स एक महान खेळाडू आहे, त्याने चेंडू पकडून तो कोणत्याही बाजूला फेकू शकला असता. तो नॉन स्ट्रायकर एन्डला देखील चेंडू फेकून दोघांपैकी एकाला बाद करू शकला असता. मात्र, त्यामुळे अशा प्रकारची धाव घेण्याची आवशयकता नव्हती. खेळ पूर्णपणे दोन्ही खेळाडूंनाच्या नियंत्रणात होता. अशा टप्प्यावर अशा चुकांची आवश्यकता नव्हती. मात्र, विराट कोहली धाव पूर्ण करू शकला असता, असे मला वाटते, असे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जस्टिन लँगर म्हणाला.





