IND vs AUS 4th Test : …त्यामुळे रोहित शर्मा सलामीला खेळणार, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने केलं स्पष्ट…

IND vs AUS 4th Test (Melbourne) : – कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटीसाठी अनुपस्थित असल्याने लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी भारताकडून सलामीवीराची भूमिका बजावली होती. पहिल्या सामन्यात ही जोडी यशस्वी ठरली होती. त्यामुळे ऍडलेड कसोटीत परातल्यानंतर रोहितने सहाव्या स्थानावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांना चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरले.
दरम्यान सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या रोहितच्या बॅटमधून देखील धावा निघाल्या नाहीत. चौथ्या कसोटीत रोहित शर्मा सलामीलाच खेळणार असल्याने शुभमन गिलला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नाही, याची पुष्टी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी बॉक्सिंग डे कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
मेलबर्न येथील एमसीजीची खेळपट्टी पहाता भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाजासहित मैदानात उतरणार हे निश्चित होते. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने युवा फलंदाज शुभमन गिलला वगळून त्याच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले आहे. या संदर्भात बोलताना नायर म्हणाले, रोहित शर्मा सलामीला येणार असल्याने, एका अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविणे गरजेचे होते. अशा वेळी शुभमन गिल सारख्या युवा फलंदाजाला बाहेर राहावे लागले, हे दुर्दैवी आहे. मात्र, त्याला संघातून वगळण्यात आले असे मी म्हणणार नाही, मात्र त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकले नाही, असे नायर बोलताना म्हणाले.
IND vs AUS 4th Test | बॉक्सिंग डे टेस्टमधून शुभमन गिलला का वगळले? समोर आलं मोठे कारण…
म्हणून सुंदर संघात…
खेळपट्टी पाहून आम्हाला वाटले की गोलंदाजी आक्रमणात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केल्याने आम्हाला विविधता मिळेल, विशेषत: चेंडू 50 किंवा त्यापेक्षा जास्त षटके झाल्यानंतर. वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जडेजा हे दोघेही जुन्या चेंडूवर फायदेशीर आहेत. मागील लढतीमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि ॲलेक्स कॅरी यांनी खालच्या फळीत फलंदाजी करताना चांगल्या धावा केल्या, संघात एखादा ऑफस्पिनर असल्यास आम्हाला अतिरिक्त मदत मिळू शकेल, असे नायर बोलताना म्हणाले.





