IND A vs SA A 1st Match Update : भारत अ संघाची दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धची दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली असून, पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. सेंटर ऑफ एक्सिलेंस मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ९ बाद २९९ धावा केल्या. भारताची फिरकी जोडी आफ्रिकेसाठी ठरली डोकेदुखी – तनुष कोटियन आणि मानव सुथार या दोघांनी मिळून ६ विकेट्स घेऊन आफ्रिकी फलंदाजांना हैराण केले. कोटियनने २३ षटकांत ८३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या, तर सुथारने २० षटकांत ६२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त खलील अहमद, अंशुल कंबोज आणि गुरनूर बरार यांनी प्रत्येकी एक विकेट्स मिळवली. हरमन बंधूंच्या अर्धशतकांनी सावरला डाव – दक्षिण आफ्रिका अ संघाकडून सलामीवीर जॉर्डन हरमन याने ७१ धावांची खेळी केली, तर मधल्या फळीत रुबिन हरमन याने ५४ धावांचे योगदान दिले. याशिवाय जुबैर हमझा याने ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हेही वाचा – IND vs AUS : “बॅग ‘लिमिटेड एडिशन’, पण…”, गिल-अर्शदीपने अभिषेक शर्माच्या बॅगची उडवली टिंगल, VIDEO होतोय व्हायरल दुसऱ्या दिवशी भारत अ संघाची नजर उर्वरित एका विकेट्सवर असेल, तर ऋषभ पंतच्या फलंदाजीचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही मालिका दक्षिण आफ्रिका संघाच्या भारत दौऱ्यापूर्वीची तयारी म्हणून महत्त्वाची ठरणार आहे.