IND A vs NZ A : किवी गोलंदाजांची पळता भुई थोडी! भारताचा ५ बाद ४६४ धावांवर डाव घोषित; जुरेल, तिलक आणि सुंदरचे वादळ
IND A vs NZ A : भारत अ संघाने पहिला डाव ५ गडी बाद ४६४ धावांवर घोषित केला. त्याचवेळी प्रसिध कृष्णाने दोन विकेट घेत न्यूझीलंड अ संघाला अडचणीत आणले.

IND A vs NZ A 3rd Unofficial Test Jurel Tilak Sundar Fifties : न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या तिसऱ्या अनऑफिशियल कसोटी सामन्यात भारत ‘अ’ संघाने आपली पकड प्रचंड मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल, तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी झळकावलेल्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव ५ बाद ४६४ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड ‘अ’ संघाने अवघ्या ३६ धावांत २ महत्त्वाचे विकेट्स गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघाकडे आता तब्बल ४२८ धावांची भक्कम आघाडी असून पाहुणा संघ मोठ्या संकटात सापडला आहे.
ध्रुव जुरेलचे आक्रमक अर्धशतक; शॉर्ट चेंडूंवर चढवला हल्ला
दुसऱ्या दिवशी भारताने २ बाद २२७ धावांवरून डावाला सुरुवात केली. मैदानात उतरताच ध्रुव जुरेलने आक्रमक पवित्रा घेत किवी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सुरेख समाचार घेत त्याने आकर्षक चौकार लगावले. जुरेलने ७१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. मात्र, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूवर मोठा पूल शॉट खेळण्याच्या नादात तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर झेलबाद झाला आणि त्याची ही आक्रमक खेळी संपुष्टात आली.
तिलक आणि सुंदरची शतकी भागीदारी; ४६४ धावांवर डाव घोषित
जुरेल बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने भारतीय डावाची सूत्रे अत्यंत संयमाने सांभाळली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची अभेद्य आणि महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलक ८१ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर ५० धावांवर नाबाद राहिले. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण करताच कर्णधाराने ५ बाद ४६४ या धावसंख्येवर डाव घोषित करत न्यूझीलंडला फलंदाजीचे आमंत्रण दिले.
यशस्वीचे शतक अन् साईचे हुकलेले शतक –
@BCCI Stumps [Day 2] | #NZAvINDA
@BCCI 464-5d [146]
@BLACKCAPS 36-2 [14]@BLACKCAPS trail by 4️⃣2️⃣8️⃣ runs https://t.co/1J3i28ZOue
— LiveSportCricket (@LSportCricket) November 8, 2026
तत्पूर्वी, भारताच्या या विशाल धावसंख्येत आघाडीच्या फलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १०२ धावांची शतकी खेळी उभारून पाया रचला होता, तर साई सुदर्शनचे शतक अवघ्या १२ धावांनी हुकले; तो ८८ धावा करून बाद झाला. न्यूझीलंड ‘अ’ संघाकडून गोलंदाजीत केवळ जॅक गिब्सन याने दोन विकेट्स घेत थोडाफार प्रतिकार केला. इतर कोणत्याही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांवर अंकुश लावता आला नाही.
प्रसिध कृष्णाचा भेदक मारा; अवघ्या ३६ धावांत किवींचे २ फलंदाज गारद
भारताच्या ४६४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड ‘अ’ची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने अचूक टप्प्यावर मारा करत दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. राईस मारियू खातेही उघडू शकला नाही, तर कर्टिस हेफी १९ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था २ बाद ३६ अशी झाली असून डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि जॅक गिब्सन क्रीजवर आहेत.





