पेमेंटसाठी डिजिटल माध्यमांचा वापर वाढवा

पुणे – लॉकडाऊन काळातही देशातील सर्व बॅंका ग्राहकांना शक्य तितकी बॅंकिंग सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ग्राहकांनी पेमेंट करताना जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची गरज आहे, असे आवाहन पुुन्हा एकदा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने केले आहे.
“गेल्या महिन्यात भारतातील ग्राहकांनी आमच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था उत्तम पद्धतीने काम करत आहे. अशाच प्रकारचे सहकार्य आगामी काही महिने तरी आम्हाला अपेक्षित आहे,’ असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जारी केलेल्या व्हिडीओ मेसेजमध्ये केले आहे.
या संदेशामध्ये शक्तिकांत दास म्हणाले, “ग्राहकांना अनेक पर्यायी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये एनईएफटी, आयएमपीएस, यूपीआय, बीबीपीएस इत्यादींचा समावेश आहे.
आता मोठ्या शहराबरोबरच छोट्या शहरांतील नागरिकही या डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रावरील ताण कमी होण्यास मदत होते. एटीएम व्यवस्थाही चांगली कार्यरत आहे.’




