Pratap Sarnaik : एसटीचे जाहिरात उत्पन्न 100 कोटींपर्यंत वाढवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणा-या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे-जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये प्रताप सरनाईक बोलत होते. सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत, अशा सूचना देऊन सरनाईक म्हणाले, चांगले उत्पन्न देणा-या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमातून महामंडळाला २२-२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न १०० कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी व बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.
एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंड संबंधित संस्थेने एसटीसाठी खर्च करावा, अशी अट समाविष्ट करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. करारानुसार ५१५० इलेक्ट्रिक बस पैकी केवळ २२० बसेस एसटी महामंडळाला संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत.
भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा न करणा-या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचा करार रद्द करण्याची कार्यवाही करावी. यंदा २ हजार ६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी मार्च अखेर ८०० बसेस १०० आगारात दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व २५१ आगारांना नवीन बसेस मिळतील असे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद कले.





