पिंपरी | मावळातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. जून महिन्यात पावसाने वाकुल्या दाखल्यानंतर जुलै महिन्यात मात्र तालुक्यात सर्वदूर धो-धो पाऊस कोसळत असून त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडीवळे, कासारसाई, जाधववाडी, ठोकळवाडी, लोणावळा अशी महत्वाची धरणे असून काही दुय्यम डॅमही आहेत. तालुक्यातील या धरणांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठी केला जातो. धरणांच्या पाण्यामधून तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींना पाणी योजनेला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी दिले जाते. त्यामुळे मावळातील धरणे भरणे अत्यंत गरजेच आहे.
मागील तीन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरली असून ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सोबतच डोंगरांवरील ओहोळ, धबधबे प्रवाहित झाले असून नद्याची पाणीपातळी वाढली आहे. सर्वच धरणाच्या बॅकवॉटर भागात चांगला पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली असून धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर.बी. गव्हाणकर यांनी दिली.
पवना धरण –
मागील काही दिवसांपासून पवन मावळ भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पवना धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहरासह मावळकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ३३.२७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
वाडीवळे धरण –
नाणे मावळातील वडीवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेचशेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. वाडीवळे धरणात आजमितीस ७२.७२ टक्के इतका पाणीसाठा आहे.
आंद्रा धरण –
आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. आंद्रा धरणात सोमवारी घेतलेल्या आकडेवारीनुसार ३३.५७ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
कासारसाई धरण –
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारसाई धरणाच्या पाणीसाठ्यात देखील कमालीची वाढ झाली असून कासारसाई धरणात ४१.५९ इतका सद्यस्थिती पाणीसाठा आहे.
धरणाचे नाव – सध्याचा पाणीसाठा (टक्केवारी) – १ जूनपासून झालेला पाऊस
वाडीवळे – ७२.७२ टक्के – ९०४ मी.मी.
आंद्रा – ३३.५७ टक्के – ३४० मी.मी.
पवना – ३३.२७ टक्के – ७४३ मी.मी
कासारसाई – ४१.५९ टक्के – ३२९ मी.मी.





