पिंपरी | मुसळधार पावसामुळे इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ

कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहू लगली आहे. आंदर मावळ, पवन मावळ विभागात जोरदार पाऊस होत असून नदीच्या पाणीपात्रात आवक वाढली आहे. लोणावळा, कार्ला परिसरात दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याने रविवारी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.
जोरदार पावसामुळे कार्ला येथे एकविरा देवीच्या गडाकडे जाणारा मार्ग देखील पाण्याखाली गेला होता. तसेच मुसळधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. कार्ला, सदापूर, पाथरगाव, कामशेत भागात इंद्रायणी नदीने पाणी मर्यादा ओलांडल्याने अनेक ठिकाणी नदीपात्रालगतच्या शेतात पाणी शिरले.
यासोबत नदीकाठच्या घरांमध्ये, मळवली परिसरात अनेक सोसायट्या आणि घरकुलांत पाणी शिरले. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचे असल्याने नगरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.





