राज्यात नव मतदारांच्या संख्येत वाढ; सर्वाधिक महिला मतदार

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची झाली आहे. आता राज्यात जवळपास 9 कोटी पन्नास लाख मतदार विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 18 ते 19 वयोगटातील नव मतदारांची संख्या अगदीच नगण्य आहे. एकूण मतदारांच्या दोन टक्केच मतदार हे नव मतदार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होवू शकते. यासाठी निवडणूक आयोगाने नव मतदारांच्या नाव नोंदणीची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातून जवळपास 16.9 लाख मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले आहे. त्यामुळे 16.9 लाख मतदारांची भर पडली आहे. नव मतदारांमध्ये दहा लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे. त्या तुलनेत पुरूषांची नोंदणी ही कमी झाली आहे. 6.8 लाख पुरूषांनी नव्याने नोंदणी केली आहे.
नव्याने एकूण मतदारांची जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यातून जवळपास 9.5 कोटी मतदार मतदानाचा अधिकार विधानसभेला बजावतील. त्यात एकूण 4.9 कोटी पुरूष मतदार आहेत. तर 4.6 कोटी महिला मतदार आहेत. तर 5 हजार 944 मतदार हे तृतियपंथी मतदार आहे. नव मतदारांमध्ये 164 तृतियपंथी यांनी नोंद केली आहे. विशेष म्हणजे एकूण मतदारांचा विचार करता पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या एकदम कमी असल्याचे समोर आले आहे.
वयवर्ष 18 ते 19 असलेल्या मतदार हे एकूण मतदारांच्या फक्त दोन टक्के आहेत. दरम्यान, विधानसभेसाठी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिली होती. विधानसभेत त्याची पुनर्रावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडी उत्सुक आहे. त्यामुळे महायुतीत विरोधात रान उठवलं जात आहे. तर लाडकी बहिण योजनेच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा मानस महायुतीचा आहे.





