मुळशीत धरणासह ओढे, नद्यांच्या पातळीत वाढ

शेतकऱ्यांची भात लागवडीसाठी लगबग
पौड – मुळशीत पावसाची दमदार सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून काही भागात भात लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाने भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. ओढे, नाले, तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे मुळा, वळकी या नद्या काठ भरून वाहत असून, तर बंधारेमधील पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे.
रविवार सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पौड 60 मिलिमीटर, पिरंगुट 32, घोटवडे 70, थेरगाव 35 मुठा 75 माले 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुळशी धरण भागात जोर कायम असून मुळशी धरणात पाण्याची पातळी वाढत आहे. धरण भागात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने मुळशी धरण, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट, माणगाव या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दोन वर्षानंतर नागरिकांना मुक्त संचार करता येत असल्याने नागरिकांची मुळशीला गर्दी होत आहे. त्यामुळे सध्या हॉटेल, टपऱ्या, छोटे व्यावसायिक यांना त्यांचा फायदा होताना दिसत आहे.





