Pimpri : शाडूच्या मूर्तींच्या नोंदणीत वाढ

पिंपळे गुरव : राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव राज्यस्तरीय सोहळा म्हणून जाहीर केला आहे. पिंपरी चिंचवड शहरात बाप्पाच्या तयारीला वेग आला आहे. मात्र पीओपी मूर्तींना न्यायालयीन परवानगी मिळाली असली, तरी नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्तींकडे झुकलेला दिसतोय. पर्यावरणपूरक बाप्पाच्या निवडीसाठी शाडू मूर्ती निर्मिती करणाऱ्या कलाकारांकडे नागरिकांनी नोंदणीसाठी मोठी गर्दी केली आहे.
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. कार्यकर्ते वर्गणी जमा करण्यात व्यस्त आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरासह मावळ आणि खेड तालुक्यातील कुंभारवाड्यांमध्ये शाडूच्या गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा शहरात सुमारे २५ ते ३० टक्के नागरिकांनी शाडूच्या मूर्तीची मागणी केली असून पीओपीला परवानगी असूनही त्याच्या नोंदणीत घट झाली आहे. मूर्तीकारांचे म्हणणे आहे की, ही बदलती मानसिकता म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरण जनजागृतीचा सकारात्मक परिणाम आहे.
शाडू मूर्तींसाठी वाढती मागणी:
पिंपरीतील आकुर्डी, चिंचवडगाव, थेरगाव, दिघी, तळवडे भोसरी आदी परिसरांतील मूर्तिकारांकडे शाडूच्या मूर्तींसाठी यंदा लवकर नोंदणी झाली आहे. मूर्तीच्या आकारानुसार १२ इंचांपासून ३ फूटांपर्यंत विविध पर्याय तयार असून, सिंहासनरूढ, दगडूशेठ, बाळगणपती यासारखी मॉडेल्स अधिक मागणीत आहेत.
रंगकामास सुरुवात
सध्या मूर्त्यांचे मूळ काम पूर्ण झाले असून येत्या आठवड्यापासून रंगकामाला सुरुवात होणार आहे. मूर्तीचे दर पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये इतके आहेत. ग्राहक मूर्ती दरवर्षी एकाच कलाकाराकडून घेण्यास प्राधान्य देतात. यावर्षीही दर थोडा वाढला असला तरी नागरिकांनी स्वेच्छेने ती किंमत दिली, अशी माहिती भोसरीतील मूर्तिकाराने दिली आहे.
विसर्जनपूरक मूर्तीला पसंती
पिंपरी चिंचवड शहरातून जरी तीन नद्या वाहत असल्या तरी शहरातील काही नवीन वसाहती आणि टॉवर्स परिसर या नद्यांपासून काहीसा दूर असल्यामुळे घराजवळच विसर्जनाची सोय हवी असते. शाडूच्या मूर्ती पाण्यात विरघळल्यामुळे तीच माती नंतर बागेत वापरता येते. ही शाश्वत पर्यावरणपूरक संकल्पना लोकांना भावली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी पीओपी मूर्तीऐवजी शाडूला प्राधान्य दिले आहे.
पर्यावरणमित्र गणेशोत्सवाची चळवळ बळावतेय
शहरातील विविध शाळा, पर्यावरणप्रेमी संस्था आणि गणेश मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अभियान राबवले आहे. मूर्तिकारांकडून तयार होणाऱ्या मूर्ती शंभर टक्के शाडूच्या असल्याची खात्री घेऊनच नागरिक मूर्ती खरेदी करत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेकडून सक्तीचे मूर्तीदान
पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या दोन वर्षांत मूर्तीदान सक्तीचे केले आहे. तसेच काही ठिकाणी कृत्रिम हौदाची निर्मिती केली आहे. या हौदात नावालाच मूर्ती विर्सजित केली जाते. अवघ्या काही सेकंदात मूर्ती पाण्याबाहेर काढली जाते. त्यामुळे अनेक भाविकांनी घरीच मूर्तीचे विसर्जन व्हावे यासाठी शाडू माती मूर्तीला प्राधान्य दिले जात आहे.





