Gokul milk : गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ; सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री
महायुतीच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Gokul milk – महायुतीच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर ६ रुपयांची वाढ केली आहे. तर गाईच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरातही प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्हशीच्या दूध दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपये, तर दूध खरेदी दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रत्येक लिटरमागे तीन रुपये अधिक मिळणार आहेत. दुसरीकडे गाईच्या दूध खरेदी दरात २ रुपये आणि विक्री दरातही २ रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन दर शनिवारपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.






