Credit supply: उद्योगांच्या कर्जपुरवठ्यात वाढ

नवी दिल्ली – रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये उद्योग क्षेत्राला झालेला कर्जपुरवठा आठ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये उद्योग क्षेत्राला झालेला कर्ज पुरवठा केवळ 4.8 टक्क्यानी वाढला होता. यामुळे उद्योग क्षेत्रात आता भांडवल वापर वाढला आहे. खासगी गुंतवणूक वाढत असल्याचे लक्षणे दिसून येत आहेत.
उद्योग क्षेत्राला कर्जपुरवठा वाढला असतानाच कृषी क्षेत्राला होणारा कर्जपुरवठा मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये कमी होऊन 15.5 टक्क्यानी वाढला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये कृषी क्षेत्राला झालेला कर्जपुरवठा 17.4 टक्क्यानी वाढला होता.
सेवा क्षेत्राचा कर्जपुरवठा मंदाऊन ऑक्टोबर महिन्यात 14.1% इतका झाला आहे. जो की गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये 20.4 टक्के होता. देशातील 41 बँकांच्या कर्ज पुरवठ्याच्या आकडेवारीवरून ही माहिती संकलित करण्यात आली आहे.ज्या क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यात वाढ झाला आहे, त्यामध्ये रसायन, कोळसा, पेट्रोलियम इत्यादी क्षेत्राचा समावेश आहे. या उद्योग क्षेत्रांना गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त कर्ज पुरवठा झाला आहे.
वैयक्तिक कर्ज पुरवठ्यात मात्र बरीच घट झाली. ऑक्टोबर महिन्यात वैयक्तिक कर्ज पुरवठा केवळ 15.8टक्क्यानी वाढला. गेल्यावर्षी हा कर्ज पुरवठा 18 टक्क्यानी वाढला होता. क्रेडिट कार्ड वरील कर्जपुरवठा, वाहनासाठीचा कर्ज पुरवठा कमी झाला असल्यामुळे एकूणच वैयक्तिक कर्ज पुरवठ्यात घट झाली आहे. असे असले तरी वैयक्तिक कर्ज वर्गातील घरासाठीच्या कर्ज पुरवठ्यात बरीच वाढ झाली आहे.

