ATM charges: दुसऱ्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी १९ रुपये, शिल्लक तपासण्यास ७ रुपये लागणार

मुंबई – रिझर्व बँकेने एटीएम इंटरचेंज शुल्कात पैसे काढण्यासाठीच्या व्यवहारासाठी दोन रुपयाची तर खात्यातील शिल्लक पाहण्यासाठीच्या शुल्कात एक रुपयाची वाढ मंजूर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक मेपासून अपेक्षित आहे.
या निर्णयामुळे ज्या छोट्या बँकांच्या एटीएमची संख्या कमी आहे, त्या बँकांवर काही प्रमाणात परिणाम शक्य आहे. हा खर्च ग्राहकाकडून बँका वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात औपचारिक निर्णय झालेला नाही. या अगोदर जेव्हा एटीएम इंटरचेंज शुल्क वाढविण्यात आले होते, त्यावेळी बँकांनी ग्राहकाकडून ही रक्कम वसूल केली होती.
एखाद्या बँकेच्या ग्राहकांना दुसर्या बँकेचे एटीएम वापरल्यानंतर असे शुल्क लावले जाते. सध्या दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर प्रत्येक व्यवहाराला 17 रुपये लागतात ते आता 19 रुपये होतील आणि खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्याच्या व्यवहारासाठी अगोदर सहा रुपये लागत होते तेथे आता सात रुपये लागणार आहेत.
या अगोदर हेे शुल्क 2021 मध्ये वाढविण्यात आले होते. त्यानंतर एटीएम चालकांनी हे शुल्क वाढविण्याची मागणी केली होती. आता नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भातील माहिती 13 मार्च रोजी बँकांना दिली आहे.
काही व्यवहार मोफत
मोठ्या शहरात सध्या ग्राहकांना पहिले पाच एटीएम व्यवहार मोफत करता येतात. तर छोट्या शहरांमध्ये पहिले तीन व्यवहार मोफत करता येतात. त्यानंतर शुल्क लागते. एटीएम शुल्क वाढल्यानंतर छोट्या बँकांना त्याचा जास्त त्रास होतो. कारण या बँकांची स्वतःची एटीएम कमी असतात. या बँकेच्या ग्राहकांनी इतर बँकांची एटीएम वापरल्यानंतर त्यांना शुल्क द्यावे लागते.


