पिंपरी | जिल्हा रुग्णालयातील बंद लिफ्टमुळे रुग्णांची गैरसोय

पिंपरी, (प्रतिनिधी) – सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सतत नादुरस्त असल्याने रुग्ण व वयोवृद्ध नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रशासनाकडून काही लिफ्टचीच तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते.
काही दिवसांनतर लिफ्ट पुन्हा बंद पडत असून या लिफ्टची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय औंध-किवळे बीआरटी मार्गालगत सांगवी येथे आहे. येथे जिल्ह्याच्या सर्व भागातून रुग्ण उपचारासाठी येत असून सर्व उपचार मोफत आहेत. त्यामुळे ओपीडी व ॲडमिट रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णालयाला चार मजले असून प्रत्येक मजल्यावर विविध कक्ष आहेत. तसेच अतिदक्षता विभाग दुसऱ्या मजल्यावर व डायलिसिस विभाग पहिल्या मजल्यावर आहे.
त्यामुळे या ठिकाणाहून गंभीर झालेल्या रुग्णांना विविध तपासणीसाठी घेऊन जावे लागते. अशा रुग्णांना घेऊन जाण्यासाठी लिफ्टचीच गरज असते. मात्र, रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर आपात्कालीन सेवा विभागाच्या बाजूच्या दोन लिफ्टपैकी एक लिफ्ट सतत बंद असते. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी यांना याच लिफ्टचा वापर करावा लागतो.
तसेच स्ट्रेचरवरील रुग्ण व विविध साहित्य या लिफ्टमधून वर-खाली केले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झालेली असते. शिवाय ही लिफ्ट उंचावर असल्याने स्ट्रेचर व व्हिल चिअरवर रुग्णांना खाली-वर करताना मोठी कसरत करावी लागते.
दोन लिफ्ट अनेक महिन्यापासून बंद
बालरोग व अस्थिरोग कक्षाकडे जाणारी लिफ्ट व पाठीमागील लिफ्ट बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे. त्याकडे रुग्णालय प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले असून लिफ्ट असून त्याचा वापर होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
रुग्णालयातील लिफ्ट बऱ्याच दिवसांपासून बंद असून विद्युत विषयक कामे करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यांना याबाबत कळविण्यात आलेले आहे. – नागनाथ येणपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय.





