पुणे जिल्हा | तीन जिल्ह्यांमध्ये नियमांच्या अंमलबजावणीत विसंगती

मंचर, (प्रतिनिधी) – पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बेलगाम कारभाराचा फटका माध्यमिक शिक्षकांसह संस्थाचालकांना सहन करावा लागतो. बदली मान्यता न घेता पगार केले जातात.
यामुळे एकाच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे,नगर ,सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये नियमांच्या अंमलबजावणीमध्ये विसंगती दिसून येते असल्याने नाराजीची भावना पसरली आहे. अशी तक्रार आंबेगाव तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
पुणे येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अनेक शिक्षक वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने दूर दूर भागांमधून येतात. काही सेवक सोलापूर जिल्ह्यातून अगदी कर्नाटक सीमेपासून कामे घेऊन येतात.
तर काही नगर जिल्ह्यातील शेवगाव, शेंडी,भंडारदरा, अकोले, अशा दुर्गम भागातून विविध कामे घेऊन येतात.
परंतु अनेक वेळा कार्यालयात आल्यानंतर कार्यालयामध्ये लिपिक हजर नसतात.चौकशी केल्यास वेगवेगळ्या कामाचा बहाना करून बाहेरच असतात. त्यांचे कार्यालय अनेक वेळा संध्याकाळी पाच नंतर चालू होते.
याबाबत वरिष्ठांचे कोणतेही नियंत्रण त्यांच्यावरती दिसून येत नाही.उलट वरिष्ठांकडून त्यांची पाठराखणच केली जात आहे. व येणाऱ्या वरिष्ठ लिपिक ,प्राचार्य, ज्येष्ठ शिक्षक यांच्याशी असबे वर्तन केले जात आहे. तसेच असंसदीय भाषा सुद्धा वापरली जात आहे.
याबरोबरच जाणून-बुजून फाईल अडवल्या जातात.फाईल गहाळ केल्या जातात. थोडक्यात दप्तर दिरंगाईचा मोठी कीड पुणे विभागीय शिक्षण संचालक कार्यालयास लागलेली आहे की काय, अशी शंका येत आहे. साधे जिल्हा बदली मान्यतेचे प्रस्ताव सुद्धा महिना-महिना मंजूर होत नाहीत.
त्यामुळे अगोदरच त्या संस्थांनी टाकलेले प्रस्ताव उशिरा आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेली मान्यता महिना-महिना उशिरा, त्यामुळे अनेक सेवकांचे पगार चार- चार महिने झालेले नाहीत.
ही परिस्थिती प्रामुख्याने नगर जिल्ह्यामध्ये दिसून येते. एकीकडे जिल्हा बदली मान्यता नाही म्हणून ते विभाग शालार्थ आयडी अटॅच करत नाही. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मात्र इतर जिल्ह्यातून बदलून आलेल्या सेवकांना बदली मान्यता न घेता येईल पगार केले जातात.
अनियंत्रित कारभार…
यामुळे एकाच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यांमध्ये नियमांच्या अंमलबजावणीत विसंगती दिसून येते. या सर्व बाबींचा विचार करता संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण दिसून येत नाही.
तरी यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन,
सेवकांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. अशी माफक अपेक्षा सेवक वर्गाकडून व्यक्त केली जात असल्याचे आंबेगाव तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना अध्यक्ष प्रा. सुनील थोरात, कार्याध्यक्ष प्रा. मारुती गुंजाळ, सरचिटणीस प्रा. रामदास तनपुरे यांनी सांगितले.

