पुणे | यंदाही निघणार मिळकतकराची लाॅटरी

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांसाठी महापालिकेकडून मागील वर्षापासून लाॅटरी काढून आकर्षक बक्षिसे दिली जातात. या योजनेमुळे महापालिकेच्या मिळकतकरात लक्षणीय वाढ झाली आहे.
तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
त्यानुसार महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून विधानसभा निवडणूक संपताच ही लाॅटरी प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
मागील वर्षी या लाॅटरी योजनेत १ चारचाकी, ई- बाईक, सायकल, लॅपटाॅप, तसेच मोबाइल अशी सुमारे ४५ बक्षिसे भेट देण्यात आली होती.
१ कोटींची तरतूद
महापालिकेकडून मागील वर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत पूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांसाठी ही योजना राबविली होती. त्यामुळे सुरुवातीला दोन महिन्यांत महापालिकेस मोठा महसूल मिळाला होता.
त्यानंतर आता पालिकेकडून या वर्षी डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत कर भरणाऱ्यांसाठी ही बक्षीस योजना राबविण्याचे नियोजन आहे.
त्याची प्रक्रिया महापालिकेकडून आतापासूनच सुरू करण्यात येणार होती. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने त्या पार पडल्यानंतर ही योजना राबविणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या तिजोरीत १६२५ कोटी
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे २०२४-२४ या वर्षासाठी सुमारे १६२५ कोटींचा महसूल जमा झाला आहे. या विभागास अंदाजपत्रकात २४०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी याच दिवशी हे उत्पन्न १३८५ कोटी रुपयांचे होते.
मागील वर्षाच्या तुलनेत दीडशे कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले असले, तरी नव्याने समाविष्ट गावांतून मोठ्या प्रमाणात कर मिळाल्याने, तसेच मागील वर्षी नव्याने ७८ मिळकतींची कर आकारणी झाल्याने महापालिकेचे उत्पन्न वाढले आहे.
प्रत्यक्षात थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याने महापालिकेस अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मार्च २०२५ अखेरपर्यंत उत्पन्न वाढविण्यासाठी बक्षिस योजनेचा आधार घेतला जाणार आहे.





