पुणे जिल्हा | विड्याच्या पानातून घेतलं हजारोंचे उत्पन्न

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – हिंदू संस्कृतीत विड्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य पानाशिवाय होऊ शकत नाही. सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगी पानांना पूजा, सुपारी, लग्न समारंभ, अंत्यसंस्काराच्या कार्यातही या मध्ये पानांचा वापर केला जातो. तसेच पानांचा खाण्यासाठी वापर केला जातो.
अशा पानांची लागवड वेळू (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी,शेती तज्ज्ञ गुलाब महादेव घुले यांनी आपल्या शेतीच्या बांधावर लावलेल्या नारळाच्या झाडाच्या बुडाशी पानांच्या रोपांची लागवड एक वर्षांपूर्वी केली. पानाच्या वेलीचे तुकडे करून जीवामृतात बुडवून खड्ड्यात लागवड केल्याने किडीपासून बचाव झाला.
सुरुवातीची आठ ते दहा दिवस ठिबक सिंचनाद्वारे या वेलींना दररोज पाणी दिले. दहा ते बारा दिवसांनी या वेलींनी फूटवा आला. यानंतर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने वेलींना पाणी दिले.
विषमुक्त शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवामृताचा वापर करून रोपांची वाढ करण्यात आली. रोपांची लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी नारळाच्या झाडाला ४ फुटांवर तार बांधून पानाचे वेल त्याला बांधले. आठवड्यातून दोन वेळा एक लीटर जीवामृत प्रत्येक रोपास दिले.
पानावर पडणाऱ्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जीवामृताची पानावर फवारणी केली. या केल्या जाणाऱ्या फवारणीमुळे कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. खोडापाशी सुकलेला पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, भाताचा कोंडा, काड, पालापाचोळा, गुरांच्या उष्टावळ, वाळलेले निकृष्ट गवत वापरून जमिनीचा पृष्ठभाग झाकल्याने बाष्पिभवनाचा वेग कमी झाला.
दिलेले पाणी आणि ओलावा टिकून राहण्यासाठी मदत झाली. तण नियंत्रणात येवून गाडुंळाची संख्या वाढून जमीन भुसभुशीत राहण्यास मदत झाली.पाण्याचा योग्य निचरा झाला. विषमुक्त विड्याची पाने असल्याने २ रुपये प्रति पान बाजार भाव मिळाला. या पानांची ऑनलाईन विक्री होते. तसेच शेतावरील बांधावर विक्री होते.विषमुक्त पालेभाज्यांचा बाजार पुण्यात भरविला जातो.
एका वेलीचे अडीच हजार रुपये उत्पन्न
या बाजारपेठेत विषमुक्त विड्यांच्या पानांना मागणी जास्त असते,या पानांचा वापर मुखवास आणि तांबूल या साठी केला जातो. घुले यांच्या पानांना अमेरिकेत मागणी आहे. आतापर्यंत त्यांची पाने मुखवास आणि तांबूल यांच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचले आहेत. साधारणतां एक हजार ते बाराशे पाने एका वेलीला असल्याने एका वेलीचे अडीच हजार उत्पन्न मिळाले आहे.
शेतावर २ देशी गायीचे सहायाने ३ एकर क्षेत्र पिकवित आहे. देशी गायीपासून गोमूत्र व शेण मिळते. याचा वापर जीवामृत तयार करताना होतो. २०० लीटर पाणी,१० किलो देशी गायीचे शेण,५ लीटर देशी गायीचे गोमुत्र, १ किलो गुळ, १ किलो बेसन, मुठभर बांधावरची जीवाणू माती हे मिश्रण काठीने मिसळून दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळले.
ड्रमच्या तोंडावर गोणपाट झाकून ते ४८ तासांकरिता सावलीत ठेवले. आठवड्यातून २ वेळा १ लीटर प्रती रोप दिले. वेलांच्या मुळांना जास्त प्रमाणात जिवामृत दिल्याने वेलीवरील पानांच्या संख्येत व आकारामध्ये वाढ दिसून आली. आतापर्यंत वेलीवर ८ इंच रुंद व ११ इंच लांबीची पाने आली. -गुलाब घुले, प्रयोगशील शेतकरी, वेळू (ता.भोर)





