भटक्या-विमुक्त समाजालाही एसटी प्रवर्गात समाविष्ट करा; पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली मागणी

भोर : भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी गेली अनेक दशके सुरू असलेल्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी येत्या बुधवार, १० सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज खोपी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भटक्या-विमुक्त समाजाचे नेते माननीय पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने उपस्थित होते.
माने यांनी यावेळी स्पष्ट केले की, “हैद्राबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदीच्या आधारे मराठा समाजाचा ‘कुणबी मराठा’ म्हणून समावेश सरकारने मान्य केला. त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु, याच गॅझेटमध्ये भटक्या-विमुक्त समाजाची नोंद आदिवासी समाज म्हणून झालेली आहे. त्यामुळे आमच्या समाजातील ४२ जाती-जमातींचा समावेश एसटी प्रवर्गात करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.”
ते पुढे म्हणाले की, “कित्येक वर्षांपासून आम्ही आरक्षणासाठी लढा देत आहोत. बाहेरच्या राज्यांतील प्रस्ताव किंवा नोंदी सरकारने कधीही ग्राह्य धरल्या नाहीत. मात्र आता हैद्राबाद गॅझेटला मान्यता देऊन मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देण्यात आला आहे. तर आमच्या मागणीला का नाही? हा प्रश्न आमच्या समाजासमोर उभा आहे.”
या पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वाची बाब घडली. भोर तालुक्यातील सर्व समाजातील स्थानिक नागरिक आणि विविध प्रवर्गांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन भटक्या-विमुक्त समाजाच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. या संदर्भाचे पत्र स्वतः उपस्थित पद्मश्री लक्ष्मण माने यांना देण्यात आले. यामुळे हा संघर्ष केवळ भटक्या-विमुक्तांचा नसून, संपूर्ण समाजाचा लढा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पत्रकार परिषदेत समाजबांधवांनी शासनाने तातडीने न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच मुंबईतील उद्याच्या उपोषणासाठी सर्व स्तरातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. भोर-वेल्हा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भटक्या-विमुक्त बांधव “चलो मुंबई, चलो आझाद मैदान” या हाकेला प्रतिसाद देत रवाना होणार आहेत. त्यामुळे उद्याचे उपोषण ऐतिहासिक ठरणार असून, शासनाने या लढ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट संकेत या पत्रकार परिषदेतून देण्यात आले.





