पुणे | संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाचे महिनाभरात उद्घाटन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देहू-आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग हा भक्तीमार्ग आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन व्हावे.
तर डिसेंबर अखेरपर्यंत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे उद्घाटन करण्याचा मानस आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षांची पुनर्लागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे. तसेच पालखी थांब्यांचाही विकास करण्यात येणार आहे.’
फडणवीस म्हणाले, “आपली वारी आता वैश्विक झाली असून, वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे.
मोहोळ म्हणाले, “गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग निर्माण झाले आहेत.’
दिलीप वळसे पाटील म्हणाले, “पुणे शहर एक मोठे केंद्र झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता पुणे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच तळेगाव ते चाकण रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावी.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखीतळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि शौचालयाची व्यवस्था करावी.’ यावेळी मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, भीमराव तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले.
पीएमपीला एक हजार ई-बस देणार
“पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार मार्गाबाबत आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्याचे काम सुरु झाले आहे. पुण्याहून सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत औद्योगिक विकासाला पूरक बाबीचे नियोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता ई-बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी काळात एक हजार ई-बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत,’ असे फडणवीस यांनी सांगितले.





