‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमाचे १० डिसेंबरला उद्घाटन

पुणे – श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम येत्या १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचा शुभारंभ १० डिसेंबरला शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात होईल. तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, राज्याच्या पर्यटन आणि कौशल्य, विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित असतील. यावेळी ‘राममंदिराचे रामायण’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल.
उद्घाटनानंतर १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यातील फर्गसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार असल्याचेही घैसास म्हणाल्या. सदर उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.





