‘आरोग्यवारी’ अभियानाचे उद्घाटन…

पुणे – राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाचे उद्घाटन आज निवडुंगा विठोबा मंदिर येथे पार पडले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, महिला आयोग सदस्य संगीता चव्हाण उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या, वारीदरम्यान महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. या काळात सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष असेल. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली असून, “1091′ हा टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. यावेळी महिला वारकऱ्यांच्या हस्ते 15 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.
आमदार धंगेकर म्हणाले, वारीच्या निमित्ताने सर्व धर्मातील एकात्मता दिसून येते. वारीसाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या सुविधा केली आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात भूमिका स्पष्ट केली.
मानाच्या अश्वांचे स्वागत..
कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्या वाड्यातून 31 मे ला प्रस्थान झालेल्या माऊलींच्या दोन्ही अश्वांचे दि. 10 रोजी अलंकापुरीत हरिनामाच्या गजरात आगमन झाले. हिरा आणि मोती या अश्वांनी अंकली ते आळंदी हा उन्हातान्हात 311 किलोमीटरचा प्रवास केला आहे. पुण्यातील रास्ते वाड्यात त्यांचा 8 आणि 9 जूनला मुक्काम केला होता. शनिवारी पहाटे त्यांनी आळंदीकडे प्रस्थान ठेवले. पुणे-आळंदी मार्गावरील बिडकर वाड्यात (श्रीकृष्ण मंदिर) सरदार अर्पितसिंह बिडकर परिवाराच्या वतीने अश्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या वतीने दिंडीचे मालक आणि आळंदी देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.





