यवतमाळमध्ये बाप-लेक नदीत बुडाले

यवतमाळ – सूर्यग्रहणावेळी विधी करताना झालेल्या अपघातात बापलेकाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. “फादर्स डे’लाच पितापुत्राचा करुण अंत झाल्याने यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना घाटंजी तालुक्यातील बेलोरा रोडवरील वाघाडी नदीच्या काठावर घडली.
सूर्यग्रहण असल्याने अग्रहारी कुटुंबाने आज (रविवार 21 जून) पूजा आयोजित केली होती. पूजा पाठ आटोपल्यावर अग्रहारी कुटुंबातील सदस्य आंघोळ करण्यासाठी गेले. यावेळी 43 वर्षीय संजय शिवाप्रसाद अग्रहारी आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा आदित्य संजय अग्रहारी खोल पाण्यात बुडाले.
अग्रहारी पितापुत्र शनी मंदिरात पूजापाठ विधी करण्यासाठी गेले असताना हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहे. बापलेकाच्या निधनाने अग्रहारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.





