राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेले? कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी – अंबादास दानवे

नागपूर – सत्ताधारी सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी देशोधडीला लावले आहे. जनतेचे हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार आहे, अशा बोच–या शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणातून सरकारवर टीका केली.
अंबादास दानवे म्हणाले, राज्य थांबणार नाही, हे ब्रीदवाक्य सरकार सतत म्हणत असले तरी मागच्या अधिवेशनाची परिस्थिती पाहिल्यास राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेले? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे. 5 डिसेंबरला शपथविधी होऊन सरकारला खाते वाटप करता आले नाही, असा टोला त्यांनी रखडलेल्या खातेवाटपावरून लगावला.
सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्या भाषणावर उत्तर देताना आमचे सरकार आले तर असे होते आणि त्यांचे सरकार आले तेव्हा तसे होते, असे म्हटले. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री त्या काळात मंत्रिमंडळात सहभागी होते, हे सोयीने विसरले, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवल्याप्रकरणी त्यांनी टीकास्त्र डागले.
राज्यातील शिक्षण आरोग्य, उद्योग विभागाची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गुन्हेगारीत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षात सरासरी 126 गुन्हयाची नोंद झाली आहे. 2023 मध्ये 45 हजार 434 महिला अत्याचाराच्या घटना नोंदवल्या असून सायबर गुन्ह्यात राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.





