पुणे जिल्हा | अधिवेशनात त्यांनी सर्वांची..

जळोची, (वार्ताहर)- आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १७० पेक्षा अधिक जागा निवडून येतील. तुम्ही सुप्रिया सुळेंसारख्या रणरागिनीला खासदार बनवून संसदेत पाठवले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाचीही ठेवली नाही. सर्वांची… असे म्हणत हातवारे करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली.
शिवस्वराज्य यात्रा बारामतीत दाखल झाली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, उपस्थित होते. पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या एकदा डोक्यात बसले की, मग काय खरे नाही.
त्यांच्याकडे जिद्द एवढी प्रचंड आहे की, वयाचा अडसर त्यांच्यासमोर येत नाही. त्यांनी एकदा मनात घेतले की, तर ते पाठ लावूनच सोडतात.
त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना डिवचू नये. एकदा जागे केले आणि आव्हान दिले, की शरद पवार ते तडीस नेतात. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम तुम्ही निवडून दिलेले महाविकास आघाडीचे शिलेदार करीत आहेत.
महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला आणि शरद पवार यांच्या पाठिशी ठाम उभी आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे की, हे दिल्लीतील सरकार आम्हाला नको आहे. आता राज्यातील हे युती सरकार जाणे गरजेचे आहे.
आमच्या यात्रेला कोणताही एक रंग नाही
पाटील म्हणाले की, सध्याचे राज्य सरकार आपल्या फायद्याचे नाही, अशी खात्री जनतेला पटली आहे. त्यामुळे लोकांमध्ये लोकसभेपेक्षा जास्त उत्साह आहे.
आमचा हा काही इव्हेंट नाही आम्ही साधेपणाने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्या यात्रेला कोणताही एक रंग नाही, जनतेचा वैविध्यपूर्ण रंग हाच आमच्या यात्रेचा रंग आहे असे म्हणत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.





