पाकिस्तान बहिष्काराच्या पावित्र्यात? आयसीसीने पायक्रॉफ्टला हटविण्याची मागणी फेटाळली

दुबई : पाकिस्तानने भारतीय संघाकडून लाजिरवाणा पराभव स्विकारल्यानंतर, भारतीय खेळाडूंनी हास्तांदोलन केले नाही, असा जोरादार कांगावा पीसीबीकडून करण्यात आला. पीसीबीने आक्रमकपणे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया करंडकातून हद्दपार करावे अशी मागणी देखील एसीसीकडे केली.दरम्यान पीसीबीने, मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांचे निलंबन न केल्यास आम्ही स्पर्धेवर बहिष्कार टाकणार, हे देखील आयसीसीला पत्र लिहुन स्पष्ट केले होते. त्यामुळे ही स्पर्धा क्रिकेटपेक्षा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. आता, आयसीसीकडे हा वाद गेल्यानंतर, आयसीसीने मात्र अँडी पायक्रॉफ्ट यांना हद्दपार करण्याची पीसीबीची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे बुधवारी होणार्या यूएई विरुद्धच्या सामन्या पाकिस्तान खेळणार की नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी असणार्या पाकिस्तानला ७ गडी राखून पराभूत केले. या सामन्याच्या नाणेफेकीला देखील भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आली आघाशी हस्तांदोलन केले नाही. १६ व्या षटकांत विजयी षटकार मारल्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव व शिवम दुबे थेट पॅव्हेलियनमध्ये परतले. लढतीनंतर हस्तांदोलन करण्यासाठी भारतीय संघ मैदानात येइल, या आशेने पाकिस्तानी संघ मैदानातच काही काळ रेंगाळला मात्र, भारतीय संघ हास्तांदोलनासाठी मैदानात आलाच नाही. या गोष्टीवरुन पीसीबीने आक्रमक भूमिका घेतली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सुर्यकुमार यादवने आपली भूमिका स्पष्ट केली.
भारतीय खेळाडूंनी केलेल्या वर्तनाला, पाकिस्तानकडून कडाडून विरोध करण्यात आला. भारतीय संघाचे वर्तन हे खेळभावणेच्या विरुद्ध असल्याचे देखील पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारताने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात आशियाई क्रिकेट परिषदेकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली. तसेच पाकिस्तानाने मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी देखील नाणेफेकी दरञान दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करण्याविषयी रोखल्याचे म्हणताना, त्यांची स्पर्धेच्या अधिकार्यांच्या पॅनलमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
आशियाई क्रिकेट परिषदेने या संदर्भात आयसीसीकडे विचारणा केली व हे प्रकरण आयसीसीकडे वर्ग करण्यात आले. मात्र, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावतीने पीसीबीची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. पीटीआयने आयसीसीच्या सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनूसार, सोमवारी रात्री उशीरा आयसीसीच्या वतीने पीसीबीने दाखल केलेल्या तक्रारीवर उत्तर पाठविण्यात आले आहे. यामध्ये आयसीसीने मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटविणार नसल्याचे व पीसीबीची तक्रार फेटळली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बुधावरी होणार्या साखळी फेरीतील पाकिस्तान व यूएई दरम्यानच्या सामन्यात ६९ वर्षीय अँडी पायक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी असणार आहेत. त्यामुळे पीसीबी आता काय भूमिका घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पीसीबीने औपचारिक तक्रार दाखल केली होती
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय खेळाडू आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध आशियाई क्रिकेट परिषदेकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती. पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांनी आरोप केला होता की पायक्रॉफ्टच्या सांगण्यावरून, रविवारी दोन्ही कर्णधारांमध्ये संघ पत्रकाची देवाणघेवाण झाली नाही, जी सहसा एक मानक प्रक्रिया असते. चीमा म्हणाले होते की पायक्रॉफ्टने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांना सूर्यकुमार यादवशी हस्तांदोलन न करण्याचा सल्ला दिला होता. भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही पीसीबीने केला होता. यानंतर, पीसीबीने आयसीसीला पत्रही लिहिले. या पत्रात पीसीबीने स्पष्टपणे म्हटले आहे की जर अँडी पायक्रॉफ्टला आशिया कपच्या उर्वरित सामन्यांमधून काढून टाकले नाही तर ते यूएईविरुद्धच्या पुढील सामन्यावर बहिष्कार टाकतील. पाकिस्तान बुधवारी यूएईशी सामना करणार आहे.
पीसीबीकडून संचालकांचे निलंबन
या संपूर्ण वादामुळे संतप्त झालेल्या पीसीबीने स्वतःच्याच अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली होती. भारताविरुद्ध सात विकेटने झालेल्या पराभवानंतर, पीसीबीने त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स संचालक उस्मान वहाला यांना निलंबित केले. पाकिस्तानी माध्यमांनूसार, मोहसिन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील बोर्डाने उस्मान वहाला यांच्याविरुद्ध ही शिस्तभंगाची कारवाई केली. ते हस्तांदोलन वादावर वेळेवर कारवाई करू शकले नाहीत, ज्यामुळे हा वाद नंतर उफाळून आला.
अधिकाऱ्यांना आधिच होती कल्पना
आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये आशिया खंडातील सर्वच व्यवस्थापनातील लोकांचा समावेश आहे. यामध्ये काही बीसीसीआयचे तर काही पीसीबीचे अधिकार्यांचा देखील समावेश या संघटनेवर आहे. सध्याच्या घडीला पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे देखील अध्यक्ष आहेत. त्यामुळे यातील काही अधिकार्यांना दोन्ही कर्णधार एकमेकांशी हास्तांदोलन करणार नाहीत, याची पूर्वकल्पना होती, तरी देखील पीसीबी व एसीसीचे अध्यक्ष तथा पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी या प्रकरणात गोंधळ घातला, असे जाणकारांनी सांगितले.





