पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी “मध्य प्रदेश’च्या धर्तीवर भाजपने राज्यभरासह पुण्यात घेतलेली मतदान प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. या मतदान प्रक्रियेत विद्यमान आमदारांकडून विधानसभेसाठी इच्छुकांची नाकेबंदी केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी वाद झाले आहेत. या प्रक्रियेवर आक्षेप घेणारे शेकडो मेसेज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष आणि विधानसभांसाठी निश्चित केलेल्या पदाधिकाऱ्यांना पाठवले आहेत. त्यामुळे पक्षातील खदखद उफाळून आली आहे. पक्षातच एकमेकांना विरोध असल्याने हा वाद थांबविण्यासाठी स्थानिक नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. पक्षांतर्गत मतदान मंगळवारी होणार असल्याची माहिती शहर पदाधिकाऱ्यांना सोमवारी दुपारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. परिणामी, या बैठकीस दांडी मारलेल्या अनेक इच्छुकांना याबाबत माहितीच नव्हती. या मतदानासाठी पक्षाने १४ वेगवेगळ्या पदावर असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली होती. मात्र निरोप न देणे, दमबाजी करणे आपलेच नाव लिहण्याचे आदेश देणे, नाव न लिहिल्यास पद काढून घेण्याची भीती दाखविणे अशा प्रकारे साम-दाम-दंड-भेदचा वापर करत अनेकांनी आपलेच नाव पहिल्या क्रमांकावर कसे राहिल यासाठी “फिल्डिंग’ लावली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड नाराज असून निवडणुकीत हा वाद भाजपची डोकेदुखी ठरणार आहे. राज्यातील मोठ्या नेत्यांनाच यात लक्ष घालावे लागणार आहे. मतदान म्हणजे उमेदवारी नाही : धीरज घाटे “ही मतदान प्रक्रिया म्हणजे कोणालाही जादा मते पडली म्हणून उमेदवारी नाही,’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या प्रकाराबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. “या निवडणुकीसाठी पुण्यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात काहीच गैर नाही, मात्र, उमेदवारी देण्यापूर्वी वेगवेगळ्या पातळीवर सर्व्हे करून तसेच पक्षाला कार्यक्रम देऊन कल जाणून घेतला जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे,’ असे घाटे यांनी सांगितले. तसेच “या मतदान प्रक्रियेचा कोणताही निकाल नाही. त्यामुळे कोणाला जादा मते मिळाली तो उमेदवार असे होणार नाही. तसेच ज्यांना आपली भूमिका मांडता आली नाही, या प्रक्रियेवर ज्यांची नाराजी आहे त्यांचीही बाजू पक्षाकडून ऐकून घेतली जाणार आहे,’ असे घाटे यांनी स्पष्ट केले.