Pune District : पूर्व हवेलीत बिबट्याचा वावर वाढला

सोरतापवाडी : सोरतापवाडी, टिळेकरवाडी व पूर्व हवेलीत बिबट्याचा वावर वाढला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांनी केले आहे.
सोरतापवाडी परिसरातील माळवाडी येथे भरवस्तीत रविवारी संध्याकाळी बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही हौशी नागरिकांनी त्याचा फोटो पण काढला व सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. ही माहिती सोरतापवाडी परिसरात कळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
टिळेकरवाडीमध्ये सतत बिबट्या दिसत असून लोणकरवस्ती परिसरात रवींद्र लोणकर यांच्या शेतामध्ये दुपारी बिबट्या दिसल्याची माहिती पोलीस पाटील विजय टिळेकर यांनी दिली. दुपारी टिळेकरवाडी येथे तर संध्याकाळी सोरतापवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने पुर्व हवेलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माळवाडी येथील शेतकरी सचिन चौधरी यांच्या घराजवळुन पाँली हाऊसच्या कडेने थेऊरकर मळयातुन रेल्वे लाइनच्या शेजारी बिबट्या गेल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडु नये असे आवाहन पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांनी केले आहे.
गेल्या आठ-दहा दिवसापासून बिबट्याचा वावर हवेली तालुक्यात वाढला आहे. आज वन अधिकारी अशोक गायकवाड यांनी सोरतापवाडी परिसरात पाहणी केली व नागरिकांकडुन माहिती घेतली. यावेळी मनोज चौधरी, सचिन चौधरी, अविनाश मेमाणे दिलीप चौधरी आदी उपस्थित होते. टिळेकर वाडी येथे माजी सरपंच सुभाष लोणकर व त्यांचे बंधू रवींद्र लोणकर यांच्या शेतात ऊस तोड चालू असताना बिबट्या ऊस तोड कामगारांना दिसला. त्यानंतर पोलीस पाटील विजय टिळेकर यांनी ताबडतोब वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर आज (सोमवारी)संध्याकाळी रेस्क्यू टीम टिळेकर वाडी येथे पाहणी करण्यासाठी आली.
शेतात काम करताना दिवसा काम करावे शक्यतो शेतात रात्रीचे काम टाळावे. रात्रीच्या वेळी आवश्यक असल्यास ग्रामस्थांनी बँटरी, काठी, व तीनचार जणांच्या ग्रुपने जावे. असे आवाहन वन परिमंडल अधिकारी प्रमोद रासकर यांनी केले आहे. यावेळी पोलीस पाटील विजय टिळेकर व वन अधिकारी अशोक गायकवाड उपस्थित होते.





