रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप ‘त्यांनी’ केले त्याचा हिशेब द्यावा लागेल

शिवसेनेची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र मैदानात उतरेलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्या आरे प्रकरणावरून चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच बाण सोडला आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेतील रात्रीतूनच झाडे तोडण्यात आली, यावरून शिवसेनेने मोदी आणि फडणीसांवर निशाणा साधला. सरकारने रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप केले त्याचा हिशेब द्यावा लागेल. परक्या देशात एखाद्या जंगलास आग लागते तेव्हा त्या आगीच्या चटक्यांनी येथील लोकांना रडू कोसळते, पण आमच्या डोळयांसमोर संपूर्ण जंगल मारले जात आहे, त्याबद्दल ना पंतप्रधानांना हुंदका फुटला, ना मुख्यमंत्री अस्वस्थ झाले, असे सांगत शिवसेनेने चिमटा काढला आहे.
मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्ष तोडण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. त्यानंतर रात्रीच प्रशासनाने झाडे तोडण्याचे काम सुरू केले. यावरून बराच वाद सुरू आहे. दरम्यान, सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून ही हिटलरशाही असल्याचे सांगत भाजपावर टीका केली आहे. मुंबईचा प्राणवायू खतम करीत आहेत. रात्रीच्या अंधारात चोऱ्या आणि दरोडे पडतात. सरकारने रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप केले त्याचा हिशेब द्यावा लागेल. परक्या देशात एखाद्या जंगलास आग लागते तेव्हा त्या आगीच्या चटक्यांनी येथील लोकांना रडू कोसळते, पण आमच्या डोळयांसमोर संपूर्ण जंगल मारले जात आहे, त्याबद्दल ना पंतप्रधानांना हुंदका फुटला, ना मुख्यमंत्री अस्वस्थ झाले. झाडे तोडल्याने त्या भागात आता कॉंक्रीटचे जंगल उभे राहील. पावसाचे पाणी जिरणार नाही. ते मिठी नदीकडे वळेल व मुंबईचा विमानतळ व मोठा भाग पुराखाली जाईल. पुन्हा प्राणवायू संपला तो भाग आहेच. आमचा विकासाला, मेट्रो कारशेडला विरोध नाही, असण्याचे कारण नाही.
जंगलतोडीस आम्ही विरोध करीत आहोत. एका बाजूला झाडे जगवा, झाडे वाचवा म्हणायचे आणि त्याच वेळी मुंबईतील 2500 झाडे तोडायची. बेटी बचाव, बेटी पढावच्या घोषणा देणाऱ्या राज्यात सर्वात जास्त भ्रूणहत्या, ऑनर किलिंगसारखे प्रकार घडतात. तसेच हे जंगलतोडीचे आहे. घर तापदायक झाले म्हणून ते घरच जाळणे हा जसा मूर्खपणा ठरतो. तसेच झाडे विकासाच्या आडवी आली म्हणून जंगल मारायचे हासुद्धा गुन्हाच आहे. पुन्हा झाडे तोडूनही येथे विकासाचा काय मोठा हिमालय उभा राहणार आहे? झाडांना मतांचा अधिकार नाही. तो असता तर मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विनाचौकशी तुरुंगात टाकण्याचे आदेश सरकारने आणि न्यायालयाने दिले असते! आरेच्या बाबतीत जी दडपशाही सुरू आहे ती हिटलरशाहीच आहे!, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.





