अर्थात : बाजारपेठेच्या मरणकळा
Online - Offline Shopping : ग्राहकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी यात योग्य समतोल साधला, तर त्याचा फायदा संपूर्ण अर्थव्यवस्थेला आणि समाजालाही होऊ शकतो.

– सूर्यकांत पाठक
Online – Offline Shopping : ग्राहकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी यात योग्य समतोल साधला, तर त्याचा फायदा संपूर्ण अर्थव्यवस्थेला आणि समाजालाही होऊ शकतो.
ताज्या जागतिक आकडेवारीनुसार, तब्बल 83 टक्के ग्राहक कोणत्याही दुकानाला भेट देण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन माहिती आणि किमती तपासतात. कॅपजेमिनीच्या एका अहवालानुसार, 74 टक्के ग्राहक इन-स्टोअर ग्राहक सेवेदरम्यान (Online – Offline Shopping) मानवी संवादाला प्राधान्य देतात. यावरून ऑनलाइन सोयीसोबतच भौतिक बाजारपेठेतील प्रत्यक्ष अनुभव आणि मानवी विश्वास ग्राहकांसाठी आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते.
ऑफलाइन किंवा पारंपरिक खरेदी ही वस्तूंची विक्री-खरेदी करण्याची प्रक्रिया आहे. ती लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. देशातील शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत हजारो किरकोळ दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शोरूम, सेवा केंद्रे आणि लघु व्यावसायिक स्थानिक ग्राहकांवर अवलंबून आहेत.
जेव्हा ग्राहक आपल्या परिसरातील दुकानांमधून खरेदी करतात, तेव्हा त्या पैशाचा मोठा हिस्सा स्थानिक अर्थव्यवस्थेतच फिरत राहतो. त्यामुळे व्यापाराला चालना मिळते, रोजगारनिर्मिती होते आणि स्थानिक विकासाला गती मिळते.
भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात किरकोळ व्यापार हा रोजगाराचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात किरकोळ व्यापार क्षेत्राचे दहा टक्क्यांहून अधिक योगदान आहे, तर एकूण रोजगारात (Online – Offline Shopping) त्याचा सुमारे आठ टक्के वाटा आहे. भारत जगातील तिसर्या क्रमांकाची मोठी किरकोळ बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.
दुकाने, मॉल, शोरूम, गोदामे, वाहतूक सेवा आणि संबंधित क्षेत्रांमध्ये लाखो लोक कार्यरत आहेत. अनेकदा एखादे छोटे दुकानही अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधार बनते. फेब्रुवारी 2026 पर्यंत देशात 7 कोटी 80 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली होती आणि या क्षेत्रातून सुमारे 34 कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता.
स्थानिक दुकानदार आणि छोटे व्यापारी हे या व्यापक आर्थिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारतातील एमएसएमई क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 30 टक्के आणि निर्यातीत 40 टक्के योगदान देते. तसेच हे क्षेत्र कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देते. मात्र गेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदी मंचांच्या वाढत्या प्रभावामुळे छोट्या व्यापार्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या प्रचंड सवलती, आकर्षक ऑफर्स आणि जलद वितरणाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे ग्राहकांना तात्पुरता आर्थिक लाभ मिळत असला, तरी अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी या स्पर्धेत टिकून राहणे कठीण होत आहे.
परिणामी अनेक स्थानिक दुकानदारांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. काही व्यवसायांना तोटा सहन करावा लागत असून काही ठिकाणी दुकाने बंद करण्याची वेळही येत आहे. याचा परिणाम केवळ दुकानमालकापुरता मर्यादित राहत नाही. त्या व्यवसायाशी संबंधित कर्मचारी, पुरवठादार, वाहतूकदार आणि इतर सेवा पुरवठादार यांच्यावरही त्याचे परिणाम होतात.
मोठ्या प्रमाणावर लहान उद्योग आणि दुकाने अडचणीत आल्यास त्याचा परिणाम संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. रोजगाराच्या संधी कमी झाल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये असंघटित व्यापार, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील रोजगार 12 कोटी 80 लाखांहून अधिक झाला होता.
देशाच्या एकूण कार्यबलापैकी सुमारे 90 टक्के लोक असंघटित क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये किराणा दुकाने, छोटे रिटेल स्टोअर्स, रस्त्याकडील व्यवसाय आणि इतर स्थानिक व्यापारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याच काळात असंघटित बिगर-कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठानांची संख्या जवळपास 8 कोटींच्या आसपास पोहोचली होती. ही वाढ स्थानिक व्यापाराच्या सामर्थ्याचे आणि त्याच्या रोजगारनिर्मितीतील योगदानाचे स्पष्ट उदाहरण आहे.
मजबूत स्थानिक अर्थव्यवस्था समाजात स्थैर्य निर्माण करते. स्थानिक व्यापारामुळे परिसरातील आर्थिक व्यवहार वाढतात, नागरिकांमध्ये परस्पर संबंध दृढ होतात आणि समाजातील आर्थिक विषमता काही प्रमाणात कमी करण्यास मदत होते.
ऑफलाइन खरेदीचे काही असे फायदे आहेत, जे ऑनलाइन खरेदीत नेहमीच उपलब्ध होत नाहीत. ग्राहक जेव्हा प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तू खरेदी करतात, तेव्हा त्यांना त्या वस्तूची गुणवत्ता तपासण्याची, तिचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळते. कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा इतर अनेक वस्तूंच्या बाबतीत प्रत्यक्ष पाहणी ग्राहकांसाठी अधिक समाधानकारक ठरते. याशिवाय स्थानिक दुकानदार ग्राहकांना वैयक्तिक सेवा देतात. अनेकदा ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वर्षानुवर्षे विश्वासाचे नाते निर्माण होते. हा मानवी स्पर्श आणि परस्पर विश्वास ऑनलाइन व्यवहारांमध्ये सहसा दिसून येत नाही.
स्थानिक बाजारपेठा व्यापाराची केंद्रे म्हणून वर्षानुवर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचाही एक भाग असतात. अनेक छोटे व्यापारी स्थानिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये योगदान देतात. त्यामुळे स्थानिक व्यापार टिकून राहणे म्हणजे समाजातील आर्थिक आणि सांस्कृतिक बांधिलकीही जपली जाणे होय. याशिवाय स्थानिक पातळीवर खरेदी केल्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीची गरज कमी होते. त्यामुळे पॅकेजिंग आणि वाहतुकीमुळे होणारा पर्यावरणीय परिणामही काही प्रमाणात कमी होतो.
जगभरातील विविध अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की स्थानिक दुकानांमध्ये खर्च केलेला पैसा मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या तुलनेत अधिक प्रमाणात त्या समुदायातच पुन्हा गुंतवला जातो. यामुळे रोजगारनिर्मिती, स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीच्या सुविधांचा लाभ घेत असतानाच स्थानिक दुकानदार, व्यापारी आणि लघुउद्योजक यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.






