मनोहर पर्रिकरांच्या मुलासाठी शिवसेना मैदानात; सर्वच बिगर भाजप पक्षांनी पाठिंबा देण्याचं केलं आवाहन

पणजी – देशाचे दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून तिकीट नाकारले जाण्याची चर्चा आहे. अशा स्थितीत त्यांनी पणजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर सर्वच बिगर भाजप राजकीय पक्षांनी मनोहर पर्रिकर यांना आदरांजली म्हणून उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.
आपल्या एका ट्विटर संदेशात त्यांनी हे आवाहन केले आहे. असे झाले तर ती पर्रिकरांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही राऊत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकरले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी भाजपच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
पक्षात भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांना तिकीट दिले जाते पण पक्षाच्या निष्ठावानांना मात्र तिकीट नाकरले जाते अशी टीका त्यांनी केली होती. आपल्या वडिलांच्या जागी कोणी गुन्हेगार भाजपच्या तिकीटावर उभे राहणे आपण कदापिही मान्य करणार नाही असेही त्यांनी म्हटले होते.
गोव्याचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रिकर यांच्या संबंधात म्हटले होते की मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात पक्ष मजबूत करण्यासाठी मोठेच योगदान दिले आहे, पण त्यांच्या पश्चात कोणी त्यांचा वारसदार म्हणून केवळ तिकीटावर दावा करणार असेल तर पक्ष त्याला संधी देऊ शकत नाही. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे.


