Pune District : शिरूर लोक अदालतमध्ये तब्बल बारा कोटींचा महसूल जमा

शिरूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने घोडनदी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतमध्ये 12 कोटी 24 लाख 79 हजार 942 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
या लोक अदालतचे उद्घाटन घोडनदी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. ए. झारी, सह न्यायाधीश पी. एस. सोनकांबळे, सह न्यायाधीश डी. बी. डोमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिरूर तालुक्यातील सहकारी संस्था, विमा कंपनी, महावितरण कंपनी, सहकारी व राष्ट्रीय बँका, पतसंस्था, नगरपालिका, ग्रामपंचायती व वित्तीय संस्थाचे दावे प्रलंबित होते. हे सर्व दावे तडजोडीसाठी लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले होते.
यावेळी न्यायालयातील दिवाणी व फौजदारी 11018 दाव्यांपैकी 4848 प्रकरणे निकाली काढण्यात आले. फौजदारी व दिवाणी प्रकरणातून एकुण 37 लाख 45 हजार 421 रुपये एवढा महसुल जमा झाला तर दाखलपूर्व 4780 प्रकरणातून 11 कोटी 87 लाख 34 हजार 521 रुपये एवढा महसूल जमा झाला आहे. अशा प्रकारे लोक अदालतमध्ये एकुण 12 कोटी 24 लाख 79 हजार 942 रुपये महसूल जमा झाला आहे.
यावेळी घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमित खेडकर, उपाध्यक्ष वर्षाराणी वडगावकर, सचिव सागर जठार, अॅड. निवृत्ती वाखारे, वरिष्ठ लिपिक देवीदास बोदार्डे आदी उपस्थित होते.





