Satara: सातार्यात टेक्निलकल हायस्कूलने जपलाय तो सोनेरी क्षण
Satara छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या प्रतापगडावरील पुतळ्याच्या अनावरणाच्या समारंभाला पंडित जवाहरलाल नेहरु दि. 30 नोव्हेंबर 1957 रोजी आले होते. हा समारंभ पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवर पंडितजींची सभा तत्कालिन हजेरी माळावर आयोजित केली होती.

Satara: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पदस्पर्शाने पुलकीत झालेल्या सातार्यातील शासकीय टेक्निकल हायस्कूलने पं. नेहरू यांच्यासाठी खास तयार केलेल्या एका खुर्चीच्या रुपाने पंडितजींच्या स्मृती आजही तितक्याच आत्मियतेने जपल्या आहेत. या शाळेत दि. 14 नोव्हेंबर या दिवशी पंडितजींचा जन्मदिवस साजरा करत या घटनेला आजही उजाळा दिला जातो.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या प्रतापगडावरील पुतळ्याच्या अनावरणाच्या समारंभाला पंडित जवाहरलाल नेहरु दि. 30 नोव्हेंबर 1957 रोजी आले होते. हा समारंभ पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवर पंडितजींची सभा तत्कालिन हजेरी माळावर आयोजित केली होती. सभास्थानाच्या अगदीच समोर टेक्निकल हायस्कूल अर्थात व्यवसाय शिक्षण शाळा आहे. पंडितजी आपल्या शाळेसमोरील पटांगणातील सभेला येणार आहेत हे माहित असलेल्या शाळेचे तत्कालिन अधीक्षक सी. जी. दीक्षित यांना समजल्यानंतर त्यांनी शाळेतील कारपेंटर विभागाचे शिक्षक कपडेकर यांना पंडितजींच्या सभेसाठी खास खुर्ची तयार करण्यास सांगितले.
श्री. कपडेकर यांनीही आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून अत्यंत देखणी अशी सागवानी लाकडाची खुर्ची तयार केली. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून सातार्यातील सभेला उपस्थित असलेले पंडितजी याच खुर्चीवर सभास्थानी विराजमान झाले. नेहमी सभास्थानी असणार्या खुर्च्या आणि वेगळेपण असणारी ही खुर्ची पाहून पंडितजीही खुश झाले. त्यांनी चौकशी केली तेव्हा ही खुर्ची शासकीय शाळेतील शिक्षकाने तयार केल्याचे त्यांना सांगण्यात आले. कार्यक्रम संपला, पंडितजी आपल्या लवाजम्यासह निघून गेले. टेक्निकल हायस्कूलच्या इतिहासतील हा सोनेरी क्षण शाळेने आजही जपून ठेवला आहे. आज ही खुर्ची शाळेच्या मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये विराजमान आहे. दररोज या खुर्चीची साफसफाई केली जाते. आणि पंडितजींच्या जन्मदिवशी या खुर्चीवर त्यांच्या फोटो ठेवून अभिवादनही केले जाते.





