साताऱ्यात मिळकती 36 हजार, नळ जोडण्या अवघ्या 16 हजार

सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहरातील नळ कनेक्शन्सचे सर्वेक्षण पालिकेकडून होत नसल्याने अनधिकृत नळ कनेक्शन्स दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात 36 हजार मिळकतींची नोंद आहे, तर नळ कनेक्शन्स केवळ 16 हजार आहेत. सुमारे सात हजार कनेक्शन अनधिकृत असल्याचे सांगितले जाते. पालिकेच्या दफ्तरी त्यांची नोंद नाही.
सातारा शहराला कास, शहापूर योजनांमधून पाणीपुरवठा केला जातो. काही भागाला जीवन प्राधिकरणाच्या लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडून पाणीपुरवठा होतो. शहरात तब्बल 36 हजार मिळकतींची नोंद पालिका दप्तरी आहेत.
पालिका व जीवन प्राधिकरणाकडून सव्वा लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु अनधिकृत नळ जोडण्यांमुळे प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा फटका बसत आहे. पालिकेच्या दप्तरी 16 हजार नळ कनेक्शन्सची नोंद आहे.
अनधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या सात हजारांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेकडून अशा नळधारकांचा शोधच घेतला जात नसल्याने हा आकडा खरा की खोटा, यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन्सचे सर्वेक्षण करून अनधिकृत कनेक्शन्स अधिकृत करणे आवश्यक आहे.
आकडे काय सांगतात?
पाणी कर (एकूण मागणी) : 9 कोटी
शहराची लोकसंख्या : 1 लाख 20 हजार 195
एकूण मिळकती : 36 हजार
अधिकृत नळ कनेक्शन्स : 16 हजार
बोगस नळ कनेक्शन्स
शहरात अनधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या माजगावर माळ, पॉवर हाऊस झोपडपट्टी आदी भागात सर्वाधिक आहे. शहरातील काही जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागते. त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाते; परंतु व्हॉल्व्हला लागलेली गळती थांबवता येत नसल्याने अनेक वर्षांपासून पाण्याची नासाडी सुरू आहे. गळतीचे प्रमाण साडेसात टक्के आहे.
सव्वासात कोटींचा कर थकला
घरपट्टी व पाणीपट्टी हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुुख स्रोत आहेन. पाणीपट्टीतून पालिकेच्या तिजोरी दरवर्षी नऊ कोटींचा महसूल जमा होता. आतापर्यंत पावणेदोन कोटींची पाणीपट्टी वसूल झाली असून, सव्वासात कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट पालिकेला गाठायचे आहे.





