पुणे जिल्हा | राजगड तालुक्यात लोकसभा निकालावर लागतायत पैजा..

राजगड, (प्रतिनिधी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा वाढेल, असे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मात्र मतदारांमध्ये निरुत्साहच पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मतदारांची नावे मतदार यादीत सापडली नाहीत. तर अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. यास राजगड तालुकाही अपवाद नसून तालुक्यात सायंकाळी ६ पर्यंत एकूण ५२ हजार मतदानापैकी ३२ हजार ८५५ मतदान झाले.
कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार हे निकालाच्या दिवशी जाहीर होणारच आहे. मात्र, ही लढत एकतर्फी होणार नाही, हे तितकेच खरे आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना जरी सहानुभूती असली तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचाराची यंत्रणाही जोमाने लागली होती.
याचा सोक्षमोक्ष निकालाच्या दिवशी लागेलच. पण राजगड भोर व मुळशी तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे वरचढ ठरल्या तर विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे वजन तर वाढेलच शिवाय त्यांच्या विरोधकांची संख्याही आपोआप कमी होईल.
मतदान कमी झाले की जास्त झाले याबाबत तालुक्यातील गावागावांमधील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागत आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विजयाचे दावे प्रतिदावे करीत आहे. तर राजकीय जाणकारांच्या मते लढत म्हणावी इतकी दोघांनाही सोपी नाही मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना कोणते मुद्दे लक्षात ठेवले, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण या निवडणुकीमध्ये विकास कामांपेक्षा अन्यच मुद्द्यांवर अधिक भर देण्यात आला. प्रत्यक्ष विकास कामाचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगणे कठीण असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले.
कोट : महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी गावागावात, वाड्यावस्त्यांवर घराघरात जाऊन चांगल्या पद्धतीने प्रचार केला. राजगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे योगदान किती मोलाचे आहे हे पटवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरले असून मतदार १०० टक्के सुनेत्रा पवार यांना विजयी करणार. – रेवणनाथ दारवटकर, संचालक पुणे जिल्हा बँक व जिल्हा परिषद सदस्य पुणे.
राजगड तालुक्यातील जनता व मतदार सुज्ञ आहेत, याची प्रचिती आपणाला ४ जून रोजी येणारच आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामांचे दान त्यांच्या पदरात पडणार आहे. काम करणारे कोण आहे हे मतदारांना चांगलेच माहीत असल्यामुळे सुप्रिया सुळे यांना राजगड तालुक्यात निर्णायक आघाडी मिळणार असल्याचे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. – संतोष रेणुसे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राजगड तालुका शरद पवार गट
राजगड तालुक्यामध्ये जे मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे सुनेत्रा पवार यांना होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. त्यामुळे भाकरी पालटणारच. – आनंद देशमाने, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, राजगड तालुका





