कोरेगाव भीमात नागरिकांनी खोलीत कोंडला बिबट्या

बिबट निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे आठ दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले असताना आज पहाटेच्या सुमारास बिबट्या आजारी असल्याने एका कंपनी शेजारी असताना ग्रामस्थांनी हुसकावल्याने बिबट्या शेजारील एका खोलीत शिरला असता ग्रामस्थांनी बिबट्याला कोंडून घेतले असता शिरुर वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेत त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात केली आहे.
कोरेगाव भीमा येथे आठ दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असताना बुधवारी (दि. 26) सायंकाळच्या सुमारास मनुष्यवस्तीजवळ बिबट्या आल्याने खळबळ उडाली, मात्र पहाटेच्या सुमारास सणासार कंपनी जवळ बिबट्या आजारी अवस्थेत असताना नागरिकांची चाहूल लागताच एका खोलीत बिबट्या शिरला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, संतोष साळुंके, प्रताप साळुंके, सिद्धार्थ काशीद यांनी खोलीचा दरवाजा बंद करुन घेत बिबट्याला कोंडून घेतले, ही माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना मिळताच वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक बबन दहातोंडे, अभिजित सातपुते, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी याठिकाणी धाव घेत पाहणी केली.
बिबट्या आजारी असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वनविभाग रेस्क्यू टीमने शिताफीने बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले, यावेळी विक्रम गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशीद, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील भांडवलकर, संपत गव्हाणे, सुरेश शेवाळे, नितीन गव्हाणे, चेतन गव्हाणे, रोहित गायकवाड, अमोल गव्हाणे, प्रणव गव्हाणे उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थांनी बिबट्या खोलीत डांबल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती, तर वनविभागाने ताब्यात घेतलेल्या सदर बिबट्याला उचारासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केल्याचे वनपाल गौरी हिंगणे यांनी सांगितले.





